प्रीती राठी अ‍ॅसिड हल्ला प्रकरण; उच्च न्यायालयाचा निर्णय 

सहा वर्षांपूर्वीच्या प्रीती राठी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपी अंकुर पानवार याला दोषी ठरवण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी कायम ठेवला. मात्र सत्र न्यायालयाने त्याला दिलेली फाशीची शिक्षा रद्द करत उच्च न्यायालयाने त्याला जन्मठेप सुनावली. अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी फाशी सुनावण्याचे हे पहिलेच प्रकरण होते.

सत्र न्यायालयाच्या निर्णयाला पानवार याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तर त्याला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारनेही याचिका केली होती. न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने या प्रकरणी बुधवारी निकाल देत पानवारला दोषी ठरवण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला. तर त्याचवेळी त्याला फाशी सुनावण्याचा निर्णय मात्र रद्द करत त्याला जन्मठेप सुनावली.

मूळची दिल्ली येथील रहिवाशी असलेली २३ वर्षांच्या प्रीतीला आयएनएस अश्विनी येथे परिचारिकेची नोकरी लागली होती. त्यामुळे २ मे २०१३ रोजी ती दिल्लीहून मुंबईला येत होती. त्यावेळी पानवारही तिचा पाठलाग करत दिल्लीहून मुंबईला आला. ती ज्या गाडीतून मुंबईला आली त्याच गाडीत पानवारही होता. त्यामुळे प्रीती वांद्रे टर्मिनसवर उतरताच त्याने तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. या हल्ल्यात तिची दृष्टी गेली. शिवाय गंभीर जखमा झाल्या. एक महिना तिच्यावर उपचार सुरू होते. अखेर १ जून २०१३ रोजी बहुतांश अवयव निकामी झाल्याने तिचा मृत्यू झाला. पानवारचे तिच्यावर प्रेम होते. मात्र तिने लग्न करण्यास नकार दिल्याचा राग ठेवून त्याने तिच्यावर हल्ला केल्याचा पोलिसांचा आरोप होता. याप्रकरणी आधी अन्य आरोपीला अटक करण्यात आली होती. नंतर प्रीतीच्या शेजारीच राहणाऱ्या पानवारने हा हल्ला केल्याचे उघड झाले आणि पोलिसांनी त्याला अटक केली होती.

पानवारवर खून आणि गंभीर दुखापत केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ते सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी जे पुरावे सादर केले ते पुरेसे आहेत. त्यातून पानवार यानेच हा गुन्हा केल्याचे सिद्ध करण्यात पोलिसांना यश आले आहे. सत्र न्यायालयाने त्याला या आरोपांमध्ये योग्यप्रकारे दोषी ठरवल्याचे न्यायालयाने ८९ पानी निकालपत्रात म्हटले आहे. पानवार याने ज्या प्रकारे गुन्हा करण्याआधी त्याची तयारी केली होती, त्याने ज्या पद्धतीने प्रीतीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले, तिच्या जखमांचे स्वरूप, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याबाबत दिलेले मत, तिच्या मृत्यूचे कारण या सगळ्यांचा विचार केला असता त्यातून तिचा खून करण्याचाच पानवारचा हेतू होता हे स्पष्ट होते. त्याने तिच्या चेहऱ्यावर ज्या पद्धतीने अ‍ॅसिड फेकले त्याच्या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला, असेही न्यायालयाने त्याला खुनाच्या आरोपात दोषी ठरवण्याचा निर्णय योग्य असल्याचे नमूद करताना स्पष्ट केले.

उच्च न्यायालय म्हणते..

पानवार याला फाशीची शिक्षा सुनावण्यात सत्र न्यायालयाने चूक केल्याचे ताशेरे न्यायालयाने निकालपत्रात ओढले आहेत. पानवारला एवढी कठोर शिक्षा सुनावण्याआधी त्याच्या बाजूने जाणाऱ्या बाबींचा विचार सत्र न्यायालयाने केला नाही. त्याला शिक्षा सुनावण्यात आली त्या वेळी तो अवघा २३ वर्षांचा होता. शिवाय त्याला कुठलीही गुन्हेगारी पाश्र्वभूमी नाही. असे असतानाही सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावून सत्र न्यायालयाने चूक केल्याचे न्यायालयाने प्रामुख्याने अधोरेखीत केले. तसेच पानवार याच्या बाजूने जाणाऱ्या या बाबी लक्षात घेऊन आणि हे प्रकरण काही दुर्मीळातील दुर्मीळ प्रकरण नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्याची फाशी रद्द केली.