लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने नोकरीचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई : लोकलअभावी उपनगरांतून मुंबई शहरात दररोज कामावर जाणाऱ्या महिलांची घर ते कार्यालय असा प्रवास करताना मोठी दमछाक होते आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनाही लोकल प्रवासाची परवानगी द्या आणि नोकरी वाचवा, अशी विनवणी महिला प्रवासी करू लागल्या आहेत.

कल्याणला राहणाऱ्या आणि अंधेरी मरोळला एका खासगी कं पनीत वरिष्ठ अकाऊंटंट म्हणून काम करणाऱ्या रेणुका सैनी टाळेबंदीआधी लोकलने घाटकोपपर्यंत आणि त्यानंतर मेट्रोने दीड तासात कार्यालयात पोहोचत. आता त्यांना तीन तास लागतात. कल्याण पूर्वेहून शेअर रिक्षाने एसटी आगार, तेथून एसटीने ठाणे खोपटला आणि पुन्हा रिक्षाने मुलुंड चेकनाक्याला पोहोचल्यानंतर तेथून बसने अंधेरी मरोळ असा प्रवास त्यांना करावा लागतो.

ऑगस्टपासून पुन्हा कामावर जाऊ लागले. पण प्रवासातच चार हजार रुपये जातात. कं पनीने वेतनात ३० टक्के  कपात के ली आहे. त्यामुळे घरखर्च आणि वाहतूक खर्च भागवणार कसा, असा प्रश्न रेणुका विचारतात. नोकरी टिकवण्यासाठी कार्यालयात दररोज जावे लागते. पण प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही परवडत नाही. आमच्या या त्रासाची दखल घेऊन लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी के ली.डोंबिवलीला राहणाऱ्या आणि दादरला आर्किटेक्ट कं पनीत कार्यालयीन कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या स्नेहल पटवर्धन यांना दररोज तीन ते चार तास प्रवास करावा लागतो. टाळेबंदीआधी हाच प्रवास एका तासात होत होता. सुरुवातीचे दिवस आठवडय़ातून दोन ते तीन दिवस जात होते, आता दररोज कामावर बोलावले जाते. प्रवासाला दररोज ४०० रुपये खर्च येतो. नोकरी टिकवण्याकरिता नाइलाजास्तव जाणे भाग आहे, असे स्नेहल म्हणाल्या. त्यातच कं पनीने २० ते २५ टक्के  वेतनात कपात के ली आहे. त्यामुळे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी अवस्था झाली आहे.

सामान्यांना काय उपयोग?

पश्चिम आणि मध्य रेल्वेने अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल फे ऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १५ ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेवर आणखी १९४ लोकल फे ऱ्यांची भर पडणार आहे. सध्याच्या घडीला ५०६ फे ऱ्या होत आहेत. टाळेबंदीआधी पश्चिम रेल्वेवर १,३६७ फे ऱ्या होत होत्या. म्हणजे ५० टक्के  फे ऱ्या चालविल्या जात आहेत. तर मध्य रेल्वेवर एकू ण १,७०० पैकी ४५३ फे ऱ्या टाळेबंदीत होत होत्या. या फे ऱ्यांची संख्याही ७०० पर्यंत नेण्यात येणार आहेत; परंतु त्याचा सामान्य प्रवाशांना काहीच उपयोग नाही.

खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे खूपच हाल होत आहेत. घर सांभाळून वेळखाऊ प्रवास आणि त्यासाठीचा खर्च करताना त्यांची दमछाक होते आहे. अनेकांच्या नोकरीचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

– लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ