प्रभादेवी येथील उच्चभ्रू इमारतीत ‘स्पा’आड सुरू असलेला वेश्याव्यवसाय गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने उघडकीस आणला. या कारवाईत नऊ तरुणींची सुटका करण्यात आली असून, ‘स्पा’चालक तरुणी आणि मालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या इमारतीच्या तळमजल्यावर ‘रेजुन्वा स्पा’ असून तेथे संध्याकाळी पाचच्या सुमारास अमली पदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे आणि पथकाने छापा घातला. मसाज किंवा अन्य सेवांआड या स्पामध्ये वेश्याव्यवसाय केला जातो, अशा तक्रारी मुंबई पोलिसांकडे येत होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.

उपायुक्त लांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेश्याव्यवसायात ओढण्यात आलेल्या नऊ तरुणींची सुटका करण्यात आली आहे. तर ‘स्पा’ चालविणाऱ्या तरुणीला फौजदारी दंड संहितेतील तरतुदीनुसार नोटीस जारी करून शनिवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले. धाड पडली तेव्हा केंद्राचा मालक सलीम शेख पसार झाला. त्याला रात्री उशिरा दादर पोलिसांनी अटक केली.

‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार, प्रभादेवी येथील प्रसिद्ध गुरुद्वाराशेजारच्या सिद्धिविनायक होरायझन इमारतीत निवृत्त आयपीएस अधिकारी, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे नेते, उद्योजक, कंपन्यांचे संचालक आदी वास्तव्यास आहेत. येथील सहकारी गृहनिर्माण संस्थेने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तळमजल्यावरील जागेत सुरू असलेले ‘स्पा’ बंद करण्यासाठी जागा मालकाला विनंती केली होती. त्याशिवाय ‘स्पा’साठी केलेल्या अनियमित बांधकामाबाबतही संस्थेच्या तक्रारी होत्या. दादर पोलिसांनी या केंद्रावर दहा महिन्यांपूर्वी कारवाई केली होती, मात्र काही दिवसांनंतर पुन्हा येथील वेश्याव्यवसाय सुरू झाला.