23 January 2020

News Flash

दादरमध्ये १००० वाहनांसाठी तळ

या इमारतीच्या आसपासच्या परिसरांत शिवाजी पार्क, चैत्यभूमी, सिद्धिविनायक मंदिर आदी आहे

‘कोहिनूर स्क्वेअर’मधील सार्वजनिक वाहनतळ पालिकेच्या ताब्यात; वाहने उभी करणाऱ्यांसाठी बससेवा सुरू करण्याचा विचार

प्रसाद रावकर, मुंबई

मुंबईतील मध्यवर्ती आणि सर्वात गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर भागात तब्बल एक हजार वाहने एका वेळेस उभी करता येतील, इतकी क्षमता असलेले वाहनतळ पालिकेला उपलब्ध झाले आहे. शिवसेना भवनसमोरील ‘कोहिनूर स्क्वेअर हाइट्स’ या इमारतीमधील १००८ वाहन क्षमतेचे वाहनतळ पालिकेने ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी वाहने उभी करून दूरच्या ठिकाणी जाणाऱ्यांसाठी मिनी बससेवा सुरू करण्याचा विचारही पालिकेने चालवला आहे.

पुनर्विकासातून उभ्या राहिलेल्या ‘कोहिनूर स्क्वेअर’ या बहुमजली इमारतीच्या बांधकामाला परवानगी देताना तेथे १००८ वाहने उभी करण्याची क्षमता असलेले सार्वजनिक वाहनतळ तयार करून देण्याची अट पालिकेने घातली होती. या अटीनुसार विकासकाने या इमारतीमध्ये सार्वजनिक वाहनतळ उपलब्ध करून दिले आहे. अलीकडेच हे वाहनतळ पालिकेच्या ताब्यात आले असून वाहनतळ चालविण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. दादरवासीय आणि या परिसरात कामानिमित्त अथवा पर्यटनासाठी येणाऱ्यांना आपले वाहन उभे करण्यासाठी लवकरच हे वाहनतळ उपलब्ध होईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

या इमारतीच्या आसपासच्या परिसरांत शिवाजी पार्क, चैत्यभूमी, सिद्धिविनायक मंदिर आदी आहे. तसेच आसपासच्या परिसरांत बडय़ा कंपन्यांची कार्यालयेही आहेत. या भागात कामानिमित्त अथवा पर्यटनासाठी अनेक नागरिक आपली वाहने घेऊन येत असतात. मात्र त्यांना वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून ही मंडळी इच्छित स्थळी निघून जातात.

येथील रहिवासी आणि अन्य व्यक्तींना ‘कोहिनूर स्क्वेअर’मधील सार्वजनिक वाहनतळावर आपले वाहन उभे करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच येथे वाहने उभी करून दूरच्या अंतरावर जाणाऱ्या वाहनचालकांसाठी थेट मिनी बससेवा सुरू करण्याचाही पालिकेचा विचार आहे. त्यामुळे या भागात येणाऱ्या मंडळींना आपले वाहन सुरक्षितपणे वाहनतळात उभे करता येईल आणि बसमधून त्यांना इच्छित स्थळी जाता येईल. त्यामुळे रस्ताही मोकळा राहू शकेल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘कोहिनूर स्क्वेअर’मधील सार्वजनिक वाहनतळ लवकरच नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. वाहनतळावरून आसपासच्या परिसरांत जाण्यासाठी मिनी बस सेवा सुरू करण्याचा विचार आहे. वाहनतळापासून बस सेवा सुरू करण्यासाठी ‘बेस्ट’ला विनंती करण्यात येईल. 

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘जी-उत्तर’

First Published on July 16, 2019 3:35 am

Web Title: public parking in kohinoor square in possession of bmc zws 70
Next Stories
1 स्वाइन फ्लूचा ताप वाढला
2 आयआयटीतील मोकाट बैलांची विद्यार्थ्यांकडून ‘पाठराखण’
3 एव्हरेस्टवर चढाई म्हणजे साहसी पर्यटनच!
Just Now!
X