News Flash

बदलत्या विज्ञान प्रसारासाठी ‘आकाशवाणी’ सशक्त माध्यम

दर क्षणाला बदलणारे विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत आणि सोप्या शब्दांत पोहोचविण्यासाठी ‘आकाशवाणी’ हेच सर्वात सशक्त माध्यम आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि गणितज्ज्ञ डॉ. जयंत

| July 24, 2013 02:51 am

दर क्षणाला बदलणारे विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत आणि सोप्या शब्दांत पोहोचविण्यासाठी ‘आकाशवाणी’ हेच सर्वात सशक्त माध्यम आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि गणितज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी मंगळवारी येथे केले.
‘आकाशवाणी’ प्रसारणाच्या ८६ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने चर्चगेट येथील आकाशवाणी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘बहुजनहिताय’ या कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. नारळीकर यांच्याबरोबर या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर, लेखिका विद्या बाळ, शास्त्रीय संगीत गायिका श्रुती सडोलीकर-काटकर हे मान्यवर सहभागी झाले होते. डॉ. अच्युत गोडबोले यांनी या मान्यवरांशी संवाद साधला.
‘आकाशवाणी’ला अन्य माध्यमांचे आव्हान असले तरी ‘आकाशवाणी’चे महत्त्व कायम राहील, असा विश्वास व्यक्त करून या माध्यमाकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, अशी अपेक्षाही डॉ. नारळीकर यांनी या वेळी व्यक्त केली. या वेळी श्रृती सडोलीकर-काटकर म्हणाल्या की, ‘आकाशवाणी’कडे शास्त्रीय संगीत आणि विविध भाषणे, मुलाखती, कार्यक्रम यांचा खजिना आहे. दुर्मिळ ध्वनिमुद्रण हे आकाशवाणीचे बलस्थान असून एका विशिष्ट वेळेत हे ध्वनिमुद्रण ऐकविण्यात यावे. यामुळे श्रोत्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. तर विद्या बाळ म्हणाल्या की, ‘आकाशवाणी’ने शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी विविध विषयांवरील कार्यक्रम सादर केले असून ते सर्वदूर पोहोचले आहेत.
पाडगावकर यांनी सांगितले की, ‘आकाशवाणी’बरोबर आपले जुने ऋणानुबंध असून येथे काही वर्षे आपण नोकरी केली आहे. त्यामुळे ‘आकाशवाणी’बद्दल मला आजही प्रेम आणि आपुलकी आहे. अच्युत गोडबोले यांनी ‘आकाशवाणी’च्या सर्व कार्यक्रमांचे डिजिटलायझेशन लवकरात लवकर व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
‘आकाशवाणी’चे उपमहासंचालक डी. के. मिश्र यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संयोजन सहाय्यक केंद्र संचालक सुजाता परांजपे व कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश केळुस्कर यांचे होते.   

संगीत संध्या
सायंकाळी याच सभागृहात ‘संगीत संध्या’ हा कार्यक्रम झाला. मंजुषा पाटील-धुरी यांनी नाटय़संगीत, नंदेश उमप व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्राचे लोकसंगीत तर डायाभाई नकुम व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुजराती लोकसंगीत सादर केले. या दोन्ही कार्यक्रमांना आकाशवाणीचे श्रोते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 2:51 am

Web Title: radio powerful medium for spread to the changing science
टॅग : Science 2
Next Stories
1 अंधश्रद्धा निर्मूलन समितीला परदेशातून पैसा?
2 पुनर्वसन करायचे नसेल, तर प्रकल्प हातीच का घेता?
3 खड्डय़ांवरून मनसेची नौटंकी
Just Now!
X