पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील युवकांना, गरिबांना आणि शेतकऱ्यांना धोका देण्याचे काम केले आहे. मोदींच्या धोरणांमुळे देशात असंतोष पसरला आहे. मोदी म्हणाले होते की, मी देशाचा चौकीदार बनणार आहे. पण मोदी हे देशातील १५ ते २० उद्योगपतींचेच चौकीदार झाल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे भाजपाकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा दाखला देत त्यांनी मोदींना टोलाही लगावला. आपल्या धर्मात गुरूपेक्षा कोणीच मोठा नसतो. पंतप्रधानांचे गुरू कोण होते, असा सवाल करत लालकृष्ण अडवाणी यांच्याविरोधात काँग्रेस नेहमी लढली. पण मला दु:ख होतंय की त्यांच्या गुरूंचेच आज रक्षण केले जात नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण काँग्रेसने नेहमी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा आदर केला. पण मोदी आज हेच विसरून गेलेत.

मुंबई येथे बूथस्तरावरील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपावर टीका करण्याबरोबर काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचाही प्रयत्न केला.

अनेकवेळा अडवाणी यांची विविध कार्यक्रमात भेट होते. त्या प्रत्येकवेळी मी त्यांचा सन्मान करतो. माझ्यापुढे त्यांना उभा करतो. त्यांचा आदर करतो. काँग्रेसची ही संस्कृतीच आहे. कारण आपल्याकडे गुरू हे मोठे असतात. अटलबिहारी वाजपेयी सध्या आजारी आहेत. तिथेही मी प्रथम जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. याउलट भाजपाचे असून हाच काँग्रेस आणि भाजपात फरक असल्याची टीका त्यांनी केली.

शेतकऱ्यांचे संरक्षण आणि युवकांना रोजगार देण्याचे काम फक्त काँग्रेसच देऊ शकतो, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत त्यांच्यामुळेच आज पक्षाची प्रगती झाल्याचे म्हटले. कार्यकर्ताच पक्षाला निवडणुका जिंकून देतो. प्रत्येक कार्यकर्त्याचे रक्षण पक्षाकडून केले जाईल, असा विश्वास देत राजस्थानमध्ये कार्यकर्त्यांसाठी शक्ती प्रकल्प तयार केल्याचे सांगितले. काँग्रेस हा पक्ष नेत्यांचा नसून कार्यकर्त्यांचा असल्याचे ते म्हणाले. ही विचारधारेची लढाई आहे.

देशात २ कोटी रोजगार निर्मित करणार असल्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. भारतात सध्या २४ तासांत ४५० जणांना रोजगार मिळतो. तर चीनमध्ये ५० हजार जणांना रोजगार मिळतो. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याची टीकाही त्यांनी केली. एकीकडे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना अमित शाह यांचा मुलगा जय शाह याच्या संपत्तीत इतकी वाढ कशी होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.