भविष्यात अपघात टाळण्यासाठी रेल्वेने तातडीने उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. यापुढे शेवटच्या स्थानकात शिरणाऱ्या गाडय़ा नियोजित वेगापेक्षा जास्त वेगाने आल्या, तर त्यांचा वेग कमी करण्यासाठी आपोआप ब्रेक लागण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक टर्मिनस स्थानकात अनुषंगिक सूचना प्रणाली (ऑक्झिलरी वॉर्निग सिस्टिम) बसवली जाणार आहे.
चर्चगेट स्थानकात लोकल ट्रेन बफर मोडून प्लॅटफॉर्मवर चढल्याची घटना रविवारी घडली होती. सुदैवाने रविवार असल्याने या गाडीत जास्त प्रवासी नव्हते, तसेच स्थानकही बऱ्यापैकी रिकामे होते. हाच अपघात सोमवारी किंवा इतर दिवशी घडला असता, तर मोठय़ा प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता होती. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत. तसेच त्यासाठी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची समितीही स्थापन करण्यात आली आहे.मात्र भविष्यात असे अपघात होऊ नयेत, यासाठी रेल्वे ठोस उपाययोजना करणार असल्याचे मध्य व पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी सांगितले.
अनुषंगिक प्रणाली काय?
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या लोकल गाडय़ांमध्ये ही प्रणाली आहे. या प्रणालीनुसार मोटरमनच्या केबिनमध्ये पुढील सिग्नलबद्दलची माहिती एका पटलावर झळकते. या पटलावरील लाल, पिवळ्या आणि हिरव्या दिव्यांच्या माध्यमातून ही सूचना मोटरमनला मिळते. लाल दिवा लागला असेल, तर १५ किमी वेगमर्यादेत गाडी चालवणे बंधनकारक असते. पिवळ्या दिव्यासाठी हा वेग ३८ किमी आणि हिरव्या वा दोन पिवळ्या दिव्यांसाठी वेग ७० किमी प्रतितास एवढा असावा. या वेगापेक्षा जास्त वेगात गाडी धावली, तर धोक्याची घंटा वाजते. तरीही मोटरमनने चार सेकंदांत गाडी न थांबवल्यास  गाडीचे ब्रेक आपोआप लागतात.