प्रकल्पाचा फेरआढावा घेण्याच्या रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या सूचना

मुंबई : बारा डबा वातानुकूलित लोकल किंवा अर्धवातानुकूलित लोकल चालवण्यासंदर्भात अद्यापही स्पष्टता नसल्याने या प्रकल्पांचा आढावा घेऊन लवकरच निर्णय घेण्याच्या सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला (एमआरव्हीसी) केल्या आहेत. यावरून नव्याने दाखल होणाऱ्या २३८ वातानुकूलित लोकलचे भवितव्य अद्यापही अधांतरीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्या मध्य रेल्वेच्या ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर एक, तर पश्चिम रेल्वेवर दोन वातानुकूलित लोकल प्रवाशांच्या सेवेत आहेत. सामान्य लोकलपेक्षाही वातानुकूलित लोकलचे असलेले अवाच्या सवा भाडेदरामुळे प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद नाही. त्यामुळे याला पर्याय म्हणून अर्धवातानुकूलित लोकल चालवण्याचा विचारही रेल्वेकडून केला जात आहे. परंतु यावरही अद्याप एकमत झालेले नाही. परिणामी एमयूटीपी-३ व ३ ए मध्ये येणाऱ्या वातानुकूलित लोकलचे कामही रखडले आहे.

एमयूटीपी-३ ला डिसेंबर २०१६ मध्ये रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली. यामध्ये ४७ वातानुकूलित लोकलचाही समावेश असून या लोकल गाडय़ांसाठी दोन वेळा निविदा काढण्यात आल्या. परंतु निविदा प्रक्रियेत झालेल्या घोळामुळे ४७ वातानुकूलित लोकल मुंबईत दाखल होण्यास विलंबच होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एमयूटीपी-३ ए प्रकल्पालाही मंजुरी मिळाली आणि यामध्ये १९१ वातानुकूलित लोकल मुंबईत दाखल होणार आहेत. सध्या मुंबईत धावत असलेल्या वातानुकूलित लोकल गाडय़ांना प्रतिसाद नसल्याने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी नव्याने येणाऱ्या वातानुकूलित लोकलचा आढावा घेऊन त्याचा अहवाल देण्यास सांगितले आहे.

सध्या अर्धवातानुकूलित लोकलचा पर्याय समोर असला तरीही त्यात तांत्रिक समस्या येण्याची शक्यता असल्याने त्यावरही अंतिम निर्णय झालेला नाही. परिणामी बारा डबा वातानुकूलित लोकलमध्ये सामान्य लोकलप्रमाणे प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी ठेवून त्यानुसार भाडे आकारणीचाही विचार होत आहे. यामध्ये प्रथम श्रेणी डब्यात द्वितीय श्रेणीतील डब्यांपेक्षा अधिक चांगल्या सुविधा असतील. यावर अंतिम निर्णय झालेला नसून

याप्रमाणे आणखी काही पर्याय समोर आहेत. परंतु त्यावरही निर्णय न झाल्याने रेल्वेमंत्र्यांनी आढावा घेण्याच्या सूचना केल्याचे ‘एमआरव्हीसी’तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.