रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आणि विशेष करून महिलांच्या विविध समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने  वसई रेल्वे स्थानकाच्या प्रतिक्षागृहात रेल्वे पोलीस, आरपीएफ, पोलीस मित्र आणि महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी बैठक घेतली. या बैठकीत महिलांच्या विविध समस्यांचा पाढा वाचण्यात आला. तसेच, याचा लवकरात लवकर निपटारा करण्याचा सकारात्मक निर्णय बैठकीत घेण्यात आला.

वसई स्थानकात संपन्न झालेल्या बैठकीत महिलांच्या शौचालयाची दुरवस्था, रेल्वेतील गर्दी, गाड्यांच्या अपुऱ्या फेऱ्या आणि प्रवासातील सुरक्षा असे अनेक मुद्दे महिला प्रवासी श्रद्धा मोरे, सिक्व्वेरा , रेझीना अल्मेडा, उषा मराठे, कल्पना खरपडे आदींनी मांडल्या. महिलांसाठी शौचालयाचा अभाव स्थानकावर असल्याने महिला वर्गाची कुचंबना होते. गर्दीमुळे महिलांना गाडीत चढण्यास मिळत नाही. त्यामुळे गाड्यांच्या फेऱ्यात वाढ करण्यात यावी, असा सूर समिती आणि प्रवाशांचा होता. दरम्यान, या बैठकीला उपस्थित वसई रेल्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार आणि आरपीएफचे प्रभारी अधिकारी यादव यांनी महिलांची गैरसोय, पावसातील अडचणी याबाबत मौलिक मत व्यक्त केले. महिलांना किंवा प्रवाशांना सुरक्षा देण्यासाठी मनुष्यबळ कमी आहे. तरीही लोहमार्ग पोलीस सुरक्षा प्रदान करतील असा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी आणि आरपीएफ अधिकारी यांनी सांगितले.