मुंबईत पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. पावसाळा संपला असला तरी अद्यापही मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरु असून, पाऊस नेमका जाणार तरी कधी असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. सोमवारी रात्री मुंबईत अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस पडला. दरम्यान हवामान खात्याने मुंबईत पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापुरात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच दिवाळीतही पावसाची रिमझिम सुरु राहण्याची शक्यता आहे.
“मागील काही वर्षात हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. हे बदल आपल्या दैनंदिन जीवनात दिसून येत आहेत. त्याविषयी सांगायचे झाल्यास, काही ठिकाणी जोरात पाऊस, तर काही ठिकाणी रखरखीत ऊन हे वातावरणातील बदल ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत आहेत”, अशी माहिती पुणे वेधशाळेचे अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.
अनुपम कश्यपी यांनी पुढे सांगितलं की, “यंदा मान्सूनने जूनच्या दुसर्या आठवड्यात आगमन केले. पण त्यानंतर काही काळ मान्सूनमध्ये खंड पडला. त्यानंतर राज्यातील बहुतांश भाग मान्सूनने व्यापून टाकला. जूनच्या दुसर्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस १६ ऑक्टोबर रोजी परत गेला. मात्र पुन्हा राज्यातील अनेक भागात पावसाची संततधार सुरू झाली आहे. त्यामुळे सध्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता, १० नोव्हेंबरपर्यंत काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाडण्याचा अंदाज आहे. १० तारखेनंतर नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत हलक्या सरी पडण्याच्या शक्यता आहे”.
हिवाळ्यावरही परिणाम होण्याची शक्यता
राज्यात ज्याप्रकारे पाऊस झाला आहे. त्याच प्रमाणात थंडी देखील पडणार आहे. सर्वाधिक थंडी जानेवारीच्या दरम्यान पडणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.