मुंबईत पडलेल्या पावसामुळे शहराचा वेग मंदावला आहे. जेव्हिएलआर मार्ग, पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूकही मंदावली आहे. मुंबईची ओळख ही वेगवान शहर अशी आहे. मात्र मुसळधार पावसामुळे मुंबईचा वेग चांगलाच मंदावला आहे. वाहनांच्या एकामागोमाग रांगा पश्चिम द्रुतगती मार्गावर लागलेल्या दिसून येत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरही लोकल पाच मिनिटे उशिराने धावत आहेत. पुढचे चार ते पाच तास पाऊस असाच कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकल वाहतुकीचा वेग मंदावला आहे. धीम्या मार्गावरच्या वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. ठाणे ते मुलुंड दरम्यान रेल्वे रूळांवर पाणी साठले आहे.

 

ठाणे मुलुंड दरम्यान रेल्वे रूळांवर पाणी साठले आहे

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतल्या पश्चिम उपनगरांमध्येही पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा मुंबईकरांना होती. तो पाऊस अखेर बरसण्यास सुरूवात झाल्याने मुंबईकरांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. ठाणे जिल्ह्यातही सगळीकडेच पावसाने हजेरी लावली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील अंधेरी, पवई या ठिकाणी जोरदार पाऊस पडू लागला आहे. जून महिन्याच्या सुरूवातीलाच पाऊस सुरू होतो. मात्र घामाच्या धारांनी मुंबईकर जूनच्या अखेरपर्यंत हैराण झाले होते. त्या सगळ्याच मुंबईकरांना अखेर पावसाने दिलासा दिला आहे.

मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण या ठिकाणीही पावसाची हजेरी आहे. नवी मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाऊस सुरू झाला आहे. वायू वादळ आल्याने मान्सून चांगलाच लांबला. कुठेही पाऊस नव्हता आता मात्र पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतल्या मालाड, गोरेगाव, अंधेरी या भागांमध्येही पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे अखेर मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर, कोकण, औरंगाबाद या ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या होत्या. मात्र मुंबईत पावसाने हजेरी लावली नव्हती. गुरूवारी नाशिक, पुणे, कल्याण डोंबिवली परिसरातही पाऊस झाला. आता मात्र मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.