अरबी समुद्रातील ‘माहा’ चक्रीवादळाची तीव्रता कमी झालेली असताना मुंबईत नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पावसाने या वर्षीच्या मोसमात सर्वाधिक सरासरीचा ३० वर्षांतील विक्रम मोडला असून, नैर्ऋत्य मोसमी पाऊस संपल्यानंतरदेखील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत राज्यात सरासरीपेक्षा ७७ टक्के अधिक पाऊस झाला. मात्र पुढील चार दिवसांत राज्यात कोठेही पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली नाही.

नोव्हेंबर महिन्यातील मुंबईची आजवरची सर्वाधिक पावसाची नोंद ही १९७९ मध्ये १०१.३ मिमी नोंदविण्यात आली होती. तर या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठ दिवसांतच १०९.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या महिन्यात २ आणि ८ तारखेस पाऊस पडला. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दिवसभरात शहरात अनुक्रमे ३२.६ आणि ३०.४ मिमी पावसाची नोंद झाली. ‘माहा’ चक्रीवादळामुळे गुरुवार आणि शुक्रवारी मुंबईत पावसाने हजेरी लावली. मुंबईबरोबरच ठाणे आणि जळगाव जिल्ह्य़ांत अनेक ठिकाणी गुरुवारी रात्री जोरदार पाऊस पडला. शनिवारी दिवसभरात राज्यात पावसाची नोंद झाली नाही.

ओडिशा, प. बंगालला अतिवृष्टीचा इशारा

बंगालच्या उपसागरातील ‘बुलबुल’ हे अतितीव्र चक्रीवादळ सध्या ओडिशाच्या किनाऱ्यापासून १०० किमी, तर पश्चिम बंगालच्या किनाऱ्यापासून १४० किमी आणि बांग्लादेशपासून ३२० किमी अंतरावर आहे. पुढील टप्प्यात त्याची तीव्रता कमी होणार असून, त्याचा प्रवास इशान्येच्या दिशने सुरू राहणार आहे. त्या वेळी किनाऱ्यावर ११० ते १२० किमी वेगाने वारे वाहतील. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी प्रदेशामध्ये पुढील दोन दिवसांत काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.