राज ठाकरे यांच्या भावना

व्यंगचित्रे रोजच सुचत असतात, तसेच ती कधी कधी कॅनव्हासवर उतरवतोदेखील, परंतु ती छापायाची कुठे हा प्रश्नच आहे. कारण व्यंगचित्रांतून भूमिका मांडलेली वर्तमानपत्रांना चालत नाही, असे मत ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केले. ‘कार्टूनिस्ट कंबाइन’तर्फे आयोजित ‘व्यंगदर्शन’ या व्यंगचित्रकारांच्या दोन दिवसीय संमेलनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

या वेळी ठाकरे यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, राज यांनी मुलाखतीपेक्षा अवघी पाच-सहा मिनिटे मनोगत व्यक्त केल्याने खास मुलाखत ऐकण्यासाठी जमलेल्यांचा मात्र हिरमोड झाला. त्यांनी स्वत:च्या व्यंगचित्रकारितेच्या प्रवासाचे व बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचे दाखले देत व्यंगचित्रकारांसाठी मोलाचे सल्ले मात्र दिले. ते म्हणाले की, बाळासाहेब व वडील श्रीकांत ठाकरे यांनी माझ्याकडून व्यंगचित्रांचा खूप सराव करून घेतला. व्यंगचित्रकला ही चित्रकलेची अंतिम पायरी आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी वास्तवदर्शी चित्रकला, शरीररचना आदींचा अभ्यास व सराव करण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय व्यंगचित्रकलेत हात घालू नये, असा सल्ला देत त्यांनी बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचे मर्मही दाखवून दिले. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांविषयी ते म्हणाले की, त्यांच्या व्यंगचित्रांमधील रेषा अप्रतिम होती. व्यंगचित्र काढून झाले की, बाळासाहेब भिंतीवर ते उलटे लावून पाहायचे. त्यामुळे व्यंगचित्रामधील रेषांमधील समतोलाच्या चुका समजून येतात. आजही व्यंगचित्र काढताना मनामध्ये सतत भीती असते की, बाळासाहेब किंवा माझे वडील ते पाहत असतील. त्यामुळे व्यंगचित्र काढताना ते जास्तीतजास्त शुद्ध काढण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो.   राज यांनी सुरुवातीच्या काळात व्यंगचित्रांचा सराव करताना एखाद्या व्यंगचित्रात कचऱ्याचा ढीग दाखवायचा असेल तर कचऱ्याच्या ढिगाच्या बाजूला बसून त्याचेही रेखाटन केले असल्याचे सांगून व्यंगचित्रकलेसाठी साधनेची गरज असल्याचे प्रतिपादन केले.