नाणार प्रकल्पाची जमीन आधीच गुजराती, मारवाडी अशा परप्रांतीय लोकांना मिळतेच कशी, असा सवाल करत याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेप्रमाणेच मनसेनेही नाणार प्रकल्पाला विरोध केला असून प्रकल्प येण्याआधीच येथील जमिनी गुजरातमधील गुजराती व मारवाडी लोकांनी कशा घेतल्या, असा सवाल करत सरकारकडूनच ही माहिती फुटल्यामुळे परप्रांतातील लोकांनी या जागा घेतल्याचा आरोप आज माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी केला. मोदी हे भारताचे पंतप्रधान नाहीत तर ते गुजरातचे पंतप्रधान असून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जमिनी बळकाविण्याचेच त्यांचे धोरण आहे. नाणार येथील जमिनी आधीच गुजराती लोकांनी घेतल्या यातच सारे काही आले असून याची चौकशी होण्याची गरज आहे. मात्र आजकाल चौकशी करूनही न्याय मिळत नाही, अशा शब्दांत राज यांनी मोदी सरकारवर टीका केली.  नाणार प्रकल्प येण्याआधी ज्या परप्रांतीयांनी जमिनी विकत घेतल्या त्यांची चौकशी झालीच पाहिजे. तुम्ही इथेच जमीन का घेतली तसेच तुम्हाला हा प्रकल्प येथे येणार हे आधीच कसे कळले, हे या लोकांना विचारले पाहिजे, असे सांगून राज म्हणाले, अशा लोकांची चौकशी करायची म्हटली तरी न्यायमूर्ती लोया प्रकरणाचे काय झाले ते आपण पाहतोच आहोत. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे केवळ सांगकाम्या आहे. केंद्रातून जे सांगितले जाईल, तेवढेच हे करतात.  मुख्यमंत्री म्हणाले की, जर नाणार प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही तर गुजरातला जाईल. मुख्यमंत्र्यांना केवळ गुजरातच का दिसले? असा सवाल त्यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray comment on nanar refinery project
First published on: 22-04-2018 at 01:09 IST