मुंबईतील मैदानांच्या, बागांच्या मोकळ्या जागा खासगी विकसकांना देण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी कडाडून विरोध केला. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने इतर पक्षांच्या मदतीने बहुमताच्या जोरावर हा निर्णय घेतला असला, तरी मनसेचा त्याला विरोध आहे. या विरोधात पक्षातर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असून, कोणताही राजकीय रंग न देता मुंबईतील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
मुंबईत पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले, मुंबईतील मोकळ्या जागांवर असलेली आरक्षणे हटविण्यास मनसेच्या स्थापनेपासूनच आमचा विरोध आहे. मोकळ्या जागा, बागा, मैदाने ही या शहराची फुफ्फुसे आहेत. त्यामुळे त्यावरील आरक्षणे हटविण्यास आम्ही कायम विरोध करत आलो आहोत. तरीही पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने काल बहुमताच्या जोरावर शहरातील १२०० एकर जागा खासगी विकसकांना देण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. मनसेने पालिकेत या प्रस्तावाल विरोध केला. आता आम्ही रस्त्यावर उतरूनही या विरोधात आंदोलन करणार आहोत. मोकळ्या जागांवरील आरक्षणे काढली जाऊ नयेत. त्या जागा तशाच टिकून राहाव्यात, यासाठी आम्ही स्वाक्षरी मोहिम राबवणार आहोत. नागरिकांनी या मोहिमेला कोणताही राजकीय रंग न देता त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्वाक्षरी मोहिमेच्या काळात राज्य सरकारने या निर्णयाला स्थगिती न दिल्यास आम्ही आमच्या स्वाक्षरी मोहिमेचे बाढ मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. मुंबईतील रेसकोर्सवर केवळ घोडेच धावत नाहीत. तर परिसरातील अनेक नागरिकही तिथे फिरायला येतात. त्यामुळे तिथेही कोणताही विकास करण्याला त्यांनी विरोध केला.