शिवसेनेचे काही नेतेच मनसेला महायुतीत सामील होण्याचे आवतण देत आहेत. मग माझ्याप्रमाणेच त्यांनाही आता ‘सामना’मधून झोडपून काढा, असे सांगत राज आणि उद्धव यापुढे कधीही एकत्र येण्याची शक्यता नाही, अशी भविष्यवाणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी केली.
‘महाआघाडीत मनसे येणार का’, या चर्चेला आता टाळे ठोका, असे आवाहन करतानाच भाजपच्या नेत्यांनीसुद्धा यापुढे राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेणे बंद करावे, अशी मागणीही त्यांनी केली. यापुढे ‘टाळीच्या’ विषयाला ‘टाळा’ लावण्यात आल्याची भूमिका शिवसेनेने जाहीर केली असताना भाजप नेत्यांनी राज यांच्या भेटी घेऊन महायुतीत दरी निर्माण करू नये, असेही ते म्हणाले.
महायुतीत मनसेला घेण्याबाबत टाळीसाठी हात प्रथम शिवसेनेनेच पुढे केला होता. तर भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह सारेचजण गेली काही वर्षे मनसेने महायुतीत यावे यासाठी प्रयत्न करत होते. मनसेला महायुतीत घेण्यास माझा पहिल्यापासून विरोध होता. मात्र साऱ्यांचीच इच्छा असेल तर मी आडवा कशाला येऊ म्हणूनच माझा विरोध मी मागे घेतला होता. मात्र शिवसेनेच्या मुखपत्रातून माझ्यावर टीका करताना यापुढे चौथा गडी नको अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. त्यामुळे महाआघाडीत मनसेला घेण्याचा विषय उद्धव ठाकरे, मुंडे आणि मी लवकरच बैठक घेऊन निकाली काढू, असे आठवले यांनी पत्रकारांना सांगितले.  
लोकसभेसाठी रिपाइंला किमान चार जागा आणि विधानसभेसाठी तीस ते ३५ जागा मिळाल्या पाहिजेत अशी आपली मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

आंबेडकर स्मारकासाठी आंदोलनाचा इशारा
इंदू मिलची जागा राज्य सरकारच्या ताब्यात येऊन सहा महिने उलटले आहेत. मात्र या जागेवर डॉ. बाबासाहेबांचे स्मारक उभारण्याबाबत राज्य सरकारकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. एवढेच नव्हे तर याबाबत समिती नेमण्याची घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. येत्या १५ ऑगस्टपर्यंत सरकारने स्मारकाचे काम सुरू न केल्यास रिपाइं तीव्र आंदोलन करेल, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला.
त्याचबरोबर रेसकोर्सचा भाडेकरार रद्द करून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान बनवावे अशीही मागणी त्यांनी केली.

त्यांनाही ठोका!
सामनातून माझ्यावर टीका झाली. त्यानंतर सेनेचेच नेते रामदास कदम यांनी राज-उद्धव यांनी एकत्र आले पाहिजे, अशी भूमिका मांडली. अशीच भूमिका अन्य सेना नेतेही मांडत असून त्यांच्यावरही टीकेचा आसूड ओढणार का, असा सवालही आठवले यांनी केला.