मनमानी टोलविरोधातील आंपले आंदोलन हे शांततापूर्ण असेल. बारावीच्या परीक्षा लक्षात घेऊन शहरांमध्ये अथवा जिल्ह्य़ाच्या ठिकाणी कोणतीही वाहने अडविण्यात येणार नाहीत. उद्याच्या मनसेच्या आंदोलनात कोणतीही तोडफोड होणार नसली तरी संपूर्ण महाराष्ट्रातील महामार्ग संपूर्णपणे बंद झालेले दिसतील. टोलविरोधात मनसेने छेडलेले हे आंदोलन खणखणीतच असेल असा रोखठोक दावा करीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा सरकारला आव्हान दिले. उद्या वाशी टोलनाक्यावर आपण स्वत: आंदेलन करणार असल्याचे राज म्हणाले.
आपले रास्तारोको आंदोलन जाहीर झाल्यानंतर सरकारच्या वतीने एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने आपल्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून उद्याचे आंदोलन रद्द करण्याची विनंती केली. तसेच माझ्यासह माझ्या टोलविषयातील तज्ज्ञ लोकांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली. मात्र यापूर्वी चारवेळा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा झाली आहे. टोलमधील भ्रष्टाचार मान्य करून आघाडी सरकारमुळे आपण हतबल आहोत, असा हतबल दावा मुख्यमंत्र्यांनी केला, असे राज ठाकरे म्हणाले. त्यातच निवडणुकीच्या चर्चेसाठी ते दिल्लीला गेल्यामुळे टोलबाबत किती गंभीर आहेत हा एक प्रश्नच असल्यामुळे उद्याचा रास्ता रोको होणारच असे ठाकरे यांनी कृष्णभुवन या निवासस्थानी पत्रकार परिषदेत सांगितले. येत्या शुक्रवारी, २१ फेब्रुवारी रोजी गिरगाव ते मंत्रालय असा मोर्चाही आपण काढणार असून त्यादरम्यान सरकारला बुद्धी झाल्यास त्यांनी चर्चा करावी. मात्र या चर्चेत पत्रकारांनाही सामील करून घेतले पाहिजे, कारण नंतर नसते आरोप प्रत्यारोप मला नकोत असेही राज म्हणाले.
टोलचा घोटाळा रोखण्यासाठी कोणताही कालबद्ध कार्यक्रम माझ्याशी संपर्क साधलेल्या मुख्यमंत्र्याच्या कार्यालयातील व्यक्ती देऊ शकली नाही. यापूर्वी मी टोलसंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे उद्या खणखणीत आंदोलन होणार असेही राज यांनी सांगितले. सरकार रस्त्यासाठी एकूण तेरा प्रकारचे कर घेते आणि टोलचा चौदावा कर असतानाही चांगले रस्ते नाहीत, टोल वसुलीत पारदर्शकता नाही, टोलच्या रस्त्यांवर स्वच्छतागृहांसह कोणत्याच सुविधा नाहीत. टोल देऊन जनतेचे पैसै फुकट जात आहेत, तर टोलचा निवडणूक फंड गोळा करून मंत्री गब्बर होत आहेत. माझे उद्याचे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने असेल परंतु लोकशाही मार्गाने सरकार ऐकणार नसेल तर माझा मार्ग मला मोकळा आहे. त्यानंतर जबाबदारी सरकारची असेल असा इशाराही त्यांनी दिला.
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी चर्चेची तयार दाखविल्याकडे लक्ष वेधले असता, दरोडेखोराशी काय चर्चा करायची, माझा त्यांच्यावरच आरोप आहे. चर्चा करायची असेल तर ती मुख्यमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांशीच होऊ शकते, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष भास्कर जाधव यांनीही टोल रद्द करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे सांगताच, हे त्यांना ‘वरून’ कोणी तरी सांगितल्यामुळेच त्यांनी लिहिले असा टोला राज यांनी मारला.