विधान परिषदेची उमेदवारी दिली नाही म्हणून आम्ही भाजपला विरोध करणार नाही, असे स्पष्ट करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी भाजपने जर शेतकऱयांच्या विरोधात भूमिका घेतली, तर आम्ही सत्तेत असलो तरी त्यांचा विरोध करू, असे सांगितले.
विधान परिषदेतील चार रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेकडून चार जणांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपकडून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता वाघ यांना तर शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभेतील या दोन्ही पक्षांचे बल लक्षात घेता, हे चारही सदस्य विधान परिषदेवर निवडून जाणार असल्याचे स्पष्ट आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनाही उमेदवारी देण्याबद्दल काही दिवसांपूर्वी चर्चा होती. मात्र, अंतिम यादीमध्ये त्यांना डावलण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले, राजकारणात संकेत पाळले गेले पाहिजेत आणि सभ्य माणसे संकेत पाळतात. विधान परिषदेची उमेदवारी कोणाला द्यायची याबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही. पण आम्हाला घेतले नाही, म्हणून आम्ही भाजपला विरोध करणार नाही. भाजप सरकारची धोरणे शेतकऱयांच्या विरोधी असतील, तर सत्तेत असलो तरी त्यांचा विरोध करू, असेही त्यांनी सांगितले.