राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने अनिल देसाई तर राष्ट्रवादीने अ‍ॅड. वंदना चव्हाण या विद्यमान खासदारांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्ही पक्षांकडे पहिल्या पसंतीची पुरेशी मते असल्याने दोघांचाही विजय निश्चित मानला जातो.

विद्यमान खासदार वंदना चव्हाण यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. शिवसेनेने अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्याबद्दल खासदार देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

वंदना चव्हाण आणि डी. पी. त्रिपाठी या राष्ट्रवादीच्या दोन खासदारांची मुदत संपुष्टात येत आहे. पक्षाचे ४१ आमदार असल्याने एकच उमेदवार निवडून येणार आहे. पक्षाने पुण्याच्या माजी महापौर व गेले सहा वर्षे राज्यसभेत चांगली कामगिरी केलेल्या वंदना चव्हाण यांनाच पुन्हा संधी दिली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला. अनिल देसाई हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. केंद्रात राज्यमंत्रिपदासाठीही त्यांचे नाव निश्चित झाले होते. शपथविधीसाठी ते दिल्लीत पोहचलेही होते, पण पक्षाने त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता.

काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक

संख्याबळानुसार काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. रजनी पाटील आणि राजीव शुक्ला हे दोघे निवृत्त होत आहेत. रजनी पाटील यांचा फेरउमेदवारीकरिता प्रयत्न आहे. सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, मििलद देवरा ही नावे चर्चेत आहेत. विद्यमान आमदार संजय दत्त हेसुद्धा राज्यसभेकरिता प्रयत्नशील आहेत.