माफी मागण्याची भाजपकडून मागणी

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलसारख्या संघटनांचेही लक्ष्य तालिबानसारखेच आहे आणि भारतीय संविधान त्यांच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, असे वक्तव्य प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी केले. त्यावरून वाद निर्माण झाला असून भाजपने अख्तर यांच्याकडे माफीची मागणी के ली आहे.

आरएसएस, विश्व हिंदू परिषद हे तालिबानी मानसिकतेचे आहेत. त्यांचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. जर संधी मिळाली तर ते सीमाही ओलांडतील, असे जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. त्यावर भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत विधाने मागे घेण्याची मागणी केली आहे. अख्तर यांनी माफी मागून ते विधान मागे न घेतल्यास त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा मुंबई भाजपचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे. अख्तर यांचे वक्तव्य चुकीचे आहे, इतकेच नव्हे हा हिंदू समाजाचा अपमान आहे. हिंदू समाज बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते तालिबानवर टीका करीत आहेत. हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जाऊन तालिबानवर टीका करून दाखवावी, असे आव्हानही भातखळकर म्हणाले. जावेद अख्तर यांचे वक्तव्य निषेधार्ह असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

अख्तर काय म्हणाले?

तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांबद्दल जावेद अख्तर म्हणाले, ‘‘त्यांची वक्तव्ये माझ्या लक्षात नाहीत. मात्र अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्याचे मोजक्या मुस्लिमांनी समर्थन केले आहे. त्यांची वक्तव्ये ऐकून धक्का बसला. आज भारतातील बहुतेक तरुण मुस्लिमांना चांगली नोकरी आणि त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे असे वाटते. तर दुसरीकडे असे काही लोक आहेत जे प्रतिगामी विचारांचे समर्थन करीत आहेत. जिथे महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो, अशा प्रतिगामी विचारांना ते प्रोत्साहन देत आहेत.’’