टाळेबंदी सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत   दोन लाख २५  हजार गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात  टाळेबंदीच्या कालावधीत म्हणजे २२ मार्च ते ९ ऑगस्टपर्यंत  कलम १८८ नुसार दोन लाख २५ हजार ३८०  गुन्हे नोंद झाले असून ३३ हजार ११७ व्यक्तींना अटक करण्यात आली. यातील विविध गुन्ह्यंसाठी  १९ कोटी ८८ लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख २४  हजार २१५  पास  पोलिसांनी वितरित केले आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.

करोनाचा मुकाबला करण्यासाठी  पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, परिचारिका मेहनत घेत आहेत. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांविरूद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. या कालावधीत पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३३२ घटना घडल्या. त्यात ८८८ व्यक्तींना ताब्यात घेतले  आहे. राज्यात २४८ पोलीस अधिकारी आणि १७३२ पोलीस करोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली.