राज्यात करोना पुन्हा वेगाने वाढत असल्याचे लक्षात घेऊन ‘अन्न व औषध प्रशासना’ने (एफडीए) करोनावर गुणकारी ठरणाऱ्या ‘रेमडेसिवीर’च्या किमती कमी केल्या आहेत. ४५०० ते ५४०० रुपयांना मिळणारे रेमडेसिवीर इंजेक्शन आता १२०० ते १८०० रुपयांना राज्यातील बहुतेक खासगी रुग्णालयांत उपलब्ध होत आहे. मुंबईतील रुग्णालये अजूनही ‘एफडीए’च्या ‘विनंती’बाबत आडमुठे धोरण अवलंबत असली तरी लवकरच तेही रुग्णहिताचा विचार करून किमती कमी करतील, असा विश्वास ‘एफडीए’चे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केला.

राज्यात करोनाची दुसरी लाट आल्यापासून रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण व उपचारांतील ‘रेमडेसिवीर’चा वापर लक्षात घेऊन ‘एफडीए’ने रुग्णहितासाठी रेमडेसिवीरची किंमत रुग्णांना परवडणारी कशी ठरेल याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारनेही यापूर्वी जनहिताच्या दृष्टीने ‘औषध किमती नियंत्रण आदेश २०१३’ अंतर्गत राज्यांनी अधिकाराचा वापर करून किमती नियंत्रित करण्याचे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनीही रेमडेसिवीरच्या किमती नियंत्रित करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय औषध किमती नियंत्रण प्राधिकरणा’कडे पाठवला आहे. आयुक्त काळे यांनी रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या सहा प्रमुख कंपन्या, रिटेल केमिस्ट ड्रगिस्ट व घाऊक औषध विक्रेता संघटनांच्या प्रतिनिधींची ७ मार्चला बैठक घेऊन किमती कमी करण्याची ‘विनंती’ केली. पुणे विभाग, औरंगाबाद, नाशिक, अमरावती विभाग तसेच नागपूर विभागातील बहुतेक सर्व रुग्णालयांतून रेमडेसिवीर कमी किमतीत उपलब्ध होत आहे.

रुग्णालये, औषध विक्रेते संघटना व कंपन्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. मात्र मुंबईतील पंचतारांकित रुग्णालये व अन्य खासगी रुग्णालये अद्याप किमती कमी करण्यास तयार नाहीत. महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याशी बोलून पालिका व एफडीए संयुक्तपणे संबंधित रुग्णालय संघटना प्रतिनिधींशी बोलून लवकरच यातून मार्ग काढू असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला.

कंपनी ते घाऊक बाजारातून रुग्णालयांना रेमडेसिवीर इंजेक्शन हे ८०० ते १८०० रुपयांपर्यंत उपलब्ध करून दिले जात असल्याचे निदर्शनास आले. रुग्णालयांकडून छापील किंवा कंपनी दरानुसार किंमत आकारली जात होती. परिणामी राज्यातील सर्व रुग्णालयांना त्यांना ज्या दरात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होते त्यात ठरावीक नफा घेऊन दर आकारणी व्हावी अशी भूमिका ‘एफडीए’ ने घेत दर कमी करण्यासाठी ‘विनंती’ केली. याला राज्यातील बहुतेक खासगी रुग्णालयांनी सहकार्य केले.

– अभिमन्यू काळे, आयुक्त ‘एफडीए’