News Flash

‘विनंती’ प्रयोगामुळे कमी झाल्या ‘रेमडेसिवीर’च्या किंमती! १ इंजेक्शन आता १२०० ते १८०० रुपयांत!

संदीप आचार्य, लोकसत्ता राज्यात करोना पुन्हा वेगाने वाढत असल्याचे लक्षात घेऊन ‘अन्न व औषध प्रशासना’ने करोनावरील गुणकारी ठरणारे इंजेक्शन रेमडेसिवीरच्या किंमती ‘विनंती’ प्रयोगाद्वारे कमी केल्या

संग्रहित छायाचित्र

संदीप आचार्य, लोकसत्ता

राज्यात करोना पुन्हा वेगाने वाढत असल्याचे लक्षात घेऊन ‘अन्न व औषध प्रशासना’ने करोनावरील गुणकारी ठरणारे इंजेक्शन रेमडेसिवीरच्या किंमती ‘विनंती’ प्रयोगाद्वारे कमी केल्या आहेत. कालपर्यंत ४५०० ते ५४०० रुपयांना मिळणारे रेमडेसिवीर इंजेक्शन आता १२०० ते १८०० रुपयांना राज्यातील बहुतेक खासगी रुग्णालयात उपलब्ध होत आहे. मुंबईतील रुग्णालये अजूनही ‘एफडीए’च्या ‘विनंती’ प्रयोगाबाबत आडमुठी असली तरी लवकरच तेही रुग्णहिताचा विचार करून किंमती कमी करतील, असा विश्वास ‘अन्न व औषध प्रशासन विभागा’चे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आल्यापासून करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण व उपचारातील ‘रेमडेसिवीर इंजेक्शन १००’ चे महत्व लक्षात घेऊन ‘अन्न व औषध प्रशासना’ने रुग्णहितासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत रुग्णांना परवडणारी कशी ठरेल याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारनेही यापूर्वी जनहिताच्या दृष्टीने ‘औषध किंमती नियंत्रण आदेश २०१३’ अंतर्गत राज्यांनी अधिकाराचा वापर करून किंमती नियंत्रित करण्याचे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी एपिडेमिक अ‍ॅक्ट १८७९ तसेच अन्य कायद्यांचा अवलंब करून मास्क, सिटी स्कॅन चाचणी, करोना चाचणी तसेच रुग्णालयातील बेडचे व उपचारांचे दर यापूर्वीच नियंत्रित केले आहेत. अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनीही करोनावरील गुणकारी इंजेक्शन रेमडेसिवीरच्या किंमती नियंत्रित करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय औषध किंमती नियंत्रण प्राधिकरणा’कडे पाठवला असून त्यावर केंद्राने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

FDA कडून विनंती प्रयोगाचा अवलंब!

औषधांच्या किंमती निश्चित करणे हे ‘एफडीए’च्या थेट अधिकार कक्षेत येत नसले तरी ‘एफडीए’ कायदे तसेच एपिडेमिक अ‍ॅक्ट १८७९ व अन्य अत्यावश्यक सेवा कायद्यांचा वापर करून आयुक्त अभिमन्यू काळे यांनी रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या सहा प्रमुख कंपन्या, रिटेल केमिस्ट ड्रगिस्ट व घाऊक औषध विक्रेता संघटनांच्या प्रतिनिधींची एक बैठक ७ मार्च रोजी घेऊन ‘विनंती प्रयोगा’चा अवलंब केला. बाजारात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शन बनविणाऱ्या सहा प्रमुख कंपन्या असून त्यातील सिप्लाची छापील किंमत ४००० रुपये, झायडस हेल्थकेअर २८०० रुपये, हेटेरो ५४०० रुपये, डॉ. रेड्डीज लॅब ५४०० रुपये, मायलन ४८०० रुपये तर जुबिलन जेनेरिक कंपनीच्या रेमडेसिवीरचा दर ४७०० रुपये आहे. कंपन्यांच्या छापील किंमती, घाऊक व किरकोळ विक्रेत्यांचे कमिशन, रुग्णालयांचा वाटा आदी सर्व गोष्टींचा विचार रेमडेसिवीर’च्या किंमती कमी करताना करण्यात आला.

आयुक्त अभिमन्यू काळे यांना या ‘विनंती प्रयोगा’बाबत विचारले असता ते म्हणाले, की “आम्ही संबंधित कंपनी व सर्व घाऊक व रिटेल विक्रेता संघटनांशी सविस्तर चर्चा केली. कंपनी ते घाऊक बाजारातून रुग्णालयांना सदर इंजेक्शन हे ८०० ते १८०० रुपयांपर्यंत उपलब्ध करून दिले जात असल्याचे निदर्शनास आले. मात्र रुग्णालयांकडून छापील किंवा कंपनी दरानुसार किंमत आकारली जात होती. यात रुग्णालयांना मोठा फायदा होत होता तर रुग्णांचा खर्च वाढत होता. परिणामी राज्यातील सर्व रुग्णालयांना त्यांना ज्या दरात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत होते त्यावर अधिक ठराविक नफा घेऊन दर आकारणी व्हावी अशी भूमिका ‘एफडीए’ ने घेतली असून एफडीए च्या सर्व सहआयुक्तांच्या माध्यमातून आम्ही रेमडेसिवीर इंजेक्शनचा दर कमी करण्यासाठी ‘विनंती प्रयोग’ सुरु केला. या ‘विनंती प्रयोगा’ला राज्यातील बहुतेक खासगी रुग्णालयांनी सहकार्य केले असून या सर्व रुग्णालयात आज रेमडेसिवीर १२०० ते १८०० रुपयांपर्यंत मिळत आहे.”

मुंबईतील रुग्णालये अजूनही तयार नाहीत

“पुणे विभाग, औरंगाबाद, नाशिक, अमरावती विभाग तसेच नागपूर विभागातील बहुतेक सर्व रुग्णालयातून रेमडेसिवीर इंजेक्शन आता कमी किंमतीला रुग्णांना उपलब्ध होत आहे. रुग्णालये, औषध विक्रेते संघटना व कंपन्यांच्या सहकार्यामुळे आमचा ‘विनंती प्रयोग’ यशस्वी झाला आहे. मात्र मुंबईतील पंचतारांकित रुग्णालये व अन्य खासगी रुग्णालये अजूनही आपल्या किंमती कमी करण्यास तयार नाहीत. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याशी बोलून पालिका व एफडीए संयुक्तपणे संबंधित रुग्णालय संघटना प्रतिनिधींशी बोलून लवकरच यातून मार्ग काढू”, असा विश्वास देखील अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केला. ‘एफडीए’च्या ‘विनंती प्रयोगा’मुळे हजारो करोना रुग्णांचा औषधोपचाराचा खर्च आटोक्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 6:22 pm

Web Title: remdesivir injection on corona price decrease due to request experiment by fda pmw 88
Next Stories
1 काळजी घ्या! कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एका दिवसात ५९५ रूग्ण आढळले
2 BMCचा प्लान! निगेटिव्ह रिपोर्ट दाखवा नाहीतर, स्वॅब द्या; मॉलमध्ये प्रवेशाआधी चाचणी सक्तीची
3 सचिन वाझे आणि मनसुख हिरेन १७ फेब्रुवारीला १० मिनिटांसाठी भेटले होते; सीसीटीव्हीत कैद
Just Now!
X