दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरातील वाहतूक सेवेवर परिणाम झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्यामध्ये उतरून अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

“मुंबईत गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत जागोजागी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईकरांनो कृपया जिथे आहात तिथेच थांबा. उगाच पाण्यात उतरुन जिवाचे हाल करु नका. एखादे अत्यावश्यक काम असेल तरच पाण्याने तुडूंब भरलेल्या रस्त्यांवर उतरण्याचे धाडस करा” असे आवाहन रेणूका शहाणे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केले आहे.

मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई आणि पालघरला मुसळधार पावसाचा फटका बसला. सतत सुरु असलेल्या पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला येथील सखल भागांत पाणी साचलं असून रेल्वेसहित रस्त्यावरील वाहतूकही मंदावली. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले असून अनेकजण रस्त्यांवर तसंच रेल्वे स्थानकांवर अडकून पडले आहेत. सीएसटीएम स्थानकाबाहेर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. रेल्वे ठप्प असल्याने रस्त्याने जाण्याचा पर्याय निवडणारे रस्त्यांवरही अडकून पडले आहेत. राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या ८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत सकाळी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मात्र, पावसाची तीव्रता वाढल्यामुळे प्रशासनाकडून मुंबईसह उपनगरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा आवाहन हवामान खात्याने दिला आहे.