रामदास आठवले यांचे मत

मधु कांबळे, लोकसत्ता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एके काळी दबदबा निर्माण करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला फारसे भवितव्य राहिलेले नाही, असे परखड मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

बदललेल्या राजकीय परिस्थितीत रिपब्लिकन ऐक्य हा विषयही मागे पडला आहे. आता कार्यकर्तेही इतर पक्षांमध्ये जाऊ लागले आहेत, त्यामुळे यापुढे एकाकी लढण्यापेक्षा मोठय़ा पक्षाशी युती करूनच सत्तेचे राजकारण करावे लागेल, अशी व्यावहारिक राजकारणाची मांडणी त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली.

दलित पँथर या लढाऊ संघटनेचे आणि त्यानंतर तीस वर्षे रिपब्लिकन पक्षाच्या एका प्रभावी गटाचे नेतृत्व करणारे रामदास आठवले सध्या केंद्रातील भाजपच्या सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंळात कॅबिनेट मंत्री, पुढे तीन वेळा लोकसभेचे खासदार, आता आठ वर्षांपासून राज्यसभेचे खासदार, दुसऱ्यांदा केंद्रात मंत्री होण्याची संधी, इतक्या प्रदीर्घ काळ सत्तेचे राजकारण करूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष वाढविता आला नाही, गटबाजीने ग्रासलेल्या पक्षाला आता भवितव्य उरलेले नाही, असे काहीसे हताश उद्गार त्यांनी काढले.

महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची ताकद वाढत असताना रिपब्लिकन पक्षाने काँग्रेसबरोबर व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केल्यामुळे त्यावेळी युतीला सत्तेपासून रोखता आले. काँग्रेसबरोबर युती केल्याने रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार निवडून आले होते. मुंबई महापालिकेतही रिपब्लिकन पक्षाचे १२ नगरसेवक विजयी झाले. रिपब्लिकन पक्ष बरोबर असेल तर हमखास सत्ता मिळते, हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला कळले होते. परंतु आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. एक गट किंवा संपूर्ण रिपब्लिकन पक्ष एकत्र झाला, तर राजकीय यश मिळत नाही, त्यामुळे मोठय़ा पक्षाबरोबर युती करून सत्ता मिळविणे हाच आता मार्ग उरला आहे, असे आठवले म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय ‘ऐक्य’ अशक्य

पूर्वी रिपब्लिकन पक्षाचा निवडणुकीत पराभव झाला की, नेत्यांनी एकत्र यावे, असा जनतेतून दबाव यायचा. आता तसा दबाव येत नाही. गट काढणारे कार्यकर्ते नेत्यांनी एकत्र आले पाहिजे असा कांगावा करतात. कार्यकर्ते आता कोणत्याही पक्षात जातात. त्यांना रोखता येत नाही. त्यामुळे रिपब्लिकन ऐक्य हा विषय आता मागे पडला आहे. तरीही माझी ऐक्यासाठी नेहमी तयारी असते, परंतु प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय ऐक्याला काही अर्थ प्राप्त होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

रिपब्लिकनची जागा शिवसेनेने घेतली..

साधारणत: ९० च्या दशकापासून जवळपास वीस वर्षे काँग्रेस-रिपब्लिकन किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष असे राजकीय समीकरणच जमले होते, आता बदललेल्या परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असे नवे समीकरण तयार झाले आहे. रिपब्लिकन पक्षाची जागा शिवसेनेने घेतली असल्याचे त्यांनी मान्य केले.