२५० दशलक्ष प्लास्टिक गोळा करून प्रक्रिया करणार

राज्यात थंडावलेली प्लास्टिकबंदीची मोहीम तीव्र करण्यासाठी ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेने ‘प्लास्टिक रिसायक्लोथॉन’ हा उपक्रम सुरू केला आहे. महापालिकेबरोबरच विविध कंपन्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे. या मोहिमेद्वारे २५० दशलक्ष प्लास्टिक जमा केले जाणार आहे. या प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्यापासून विविध वस्तू तयार के ल्या जाणार आहेत.

महाराष्ट्रात २३ जूनपासून प्लास्टिक बंदी केली गेली. मात्र आता पुन्हा हळूहळू बाजारात प्लास्टिकचा वापर सुरू झाला आहे. थंडावलेली मोहीम पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘प्रोजेक्ट मुंबई’ या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. ‘प्लास्टिक रिसायक्लोथॉन’ हा त्यांचा उपक्रम २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान सुरू राहणार आहे. या उपक्रमात मुंबई महानगरपालिका, एल अ‍ॅण्ड टी, गोदरेज, पेप्सिको आदी बहुराष्ट्रीय कंपन्यादेखील संयुक्तपणे सहभागी झाल्या आहेत.

२५० ठिकाणाहून प्लास्टिक गोळा करण्यासाठी लागणारे ट्रक्स पाठवण्यात आलेले आहेत. या उपक्रमात साधारण २५० दशलक्ष प्लास्टिक जमा होण्याची शक्यता आहे. यात अरझान खंबाटा आणि दालमिया पॉलिक्रो हे त्या प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्यापासून आकर्षक वस्तू, बसण्यासाठी बाके बनविणार आहेत. मग या वस्तू महापालिकेला देण्यात येतील, असे ‘प्रोजेक्ट मुंबई’चे संस्थापक शिशिर जोशी म्हणाले.

पेपिस्को कंपनीने महाराष्ट्रातील प्लास्टिकबंदीला साठी २०२५ पर्यंत प्लास्टिक मुक्त उप्तादन करण्याचे ठरवले आहे. यातील एक भाग म्हणजे ‘प्लास्टिक रिसायक्लोथॉन’मध्ये सहभागी होणे, असे पेप्सिको कंपनीच्या व्हाइस प्रेसिडेंट नीलिमा द्विवेदी यांनी सांगितले. महापालिकेने या कार्याचे आणि पालिकेच्या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल कौतुक केले आहे. असे उपक्रम पुढेही करायला आवडतील, असे पालिकेचे साहाय्यक आयुक्त आणि प्लास्टिकबंदी जागृतीचे समन्वयक किरण दिघावकर म्हणाले.

सहा किनाऱ्यांवर सफाई

या अंतर्गत २ ऑक्टोबरला मुंबईतील सहा किनाऱ्यांवर सफाई करण्यात आली होती. मोहिमेत ‘प्लास्टिक दान’ उत्सवाला ही सुरुवात झालेली आहे. यात नागरिकांना प्लास्टिक दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. दान उत्सवासाठी पूर्वनोंदणी करण्याचे आवाहन समाज माध्यमांद्वारे करण्यात आले होते. साधारण पाच हजार नागरिकांनी दान उत्सवात सामील होण्यासाठी नोंदणी केली आहे. यात शाळा, महाविद्यालये, कार्यालये, गृहसंकुल इत्यादींनी सहभाग घेतला आहे. स्वयंसेवक जाऊन प्लास्टिक गोळा करत आहेत, असे ‘प्रोजेक्ट मुंबई’चे शिशिर जोशी म्हणाले.