करोना टाळेबंदीच्या चौथ्या पर्वात राज्यात उद्योगपर्व सुरू करण्याची भाषा करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावध पवित्रा घेतला. करोनाबाधित लाल आणि प्रतिबंधित क्षेत्रात उद्योग-व्यवसायाला परवानगी दिल्यास करोना फैलावाचा धोका असल्याचे सांगत या भागांत टाळेबंदी शिथिल करण्यास नकार देत त्यांनी राज्यात निर्बंध कायम राहतील, असे सोमवारी जाहीर के ले. त्यामुळे अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केले असताना महाराष्ट्रात मात्र टाळेबंदी मागील पानावरून पुढे सुरूच राहील.

केंद्र सरकारने १८ ते ३१ मे २०२० या काळात देशात टाळेबंदी वाढवली असली तरी राज्यातील सरकारांना स्थानिक परिस्थितीनुसार लाल, केशरी, हिरवे क्षेत्र ठरवण्यास मुभा दिली. शिवाय प्रतिबंधित क्षेत्र वगळता लाल क्षेत्रातही करोनाविषयक सर्व नियम पाळून थोडी शिथिलता देऊन काहीप्रमाणात उद्योग-व्यवसाय सुरू करण्याची भूमिका महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांनी वारंवार मांडली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या भाषणात राज्याबाबत काय निर्णय जाहीर करतात याबाबत उत्सुकता होती. मात्र, ठाकरे यांनी नव्याने कसलीही शिथिलता न देण्याची भूमिका जाहीर केली. जनजीवन सुरळीत होण्यास काही काळ लागेल, टप्प्याटप्प्याने शिथिलता दिली जाईल, अशी सावध भूमिका ठाकरे यांनी घेतली. टाळेबंदी शिथिल झाल्यास करोनाची साथ पसरण्याची भीती मुख्यमंत्र्यांच्या भाषणात वारंवार व्यक्त झाली. लाल पट्ट्यात निर्बंध शिथिल केले जाणार नाहीत, असे ठाकरे यांनी स्पष्ट केल्याने मुंबई, ठाणे, पुणे, मालेगाव, औरंगाबाद आदी शहरांमध्ये निर्बंध कायम राहणार असून अर्थचक्रोची गती मंदच राहणार आहे.

टाळेबंदीमुळे करोनाच्या वाढीचा गुणाकार रोखण्यात यश मिळाले. हिरव्या क्षेत्रात हळूवारपणे काही गोष्टी खुले करण्यास परवानगी दिली आहे. पण, लाल क्षेत्रात शिथिलता दिल्यास अमेरिका, इटलीसारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती ठाकरे यांनी व्यक्त केली. लाल क्षेत्रात काही प्रमाणात उद्योग-व्यवसाय सुरू करण्याची मागणी होत असली तरी मी वाईटपणा घ्यायला तयार आहे, टीके चा धनी व्हायला तयार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उद्योग धंद्याबाबत आपण तारेवरची कसरत करत आहोत. राज्यात पन्नास हजार उद्योग सुरू करण्यास परवाने दिले आहेत. पाच लाख मजूर कामावर रुजू झाले आहेत. सत्तर हजार उद्योगांना परवाने दिले आहेत. परंतु, लाल क्षेत्रात निर्बंध कायम ठेवले आहेत. नवीन उद्योगांसाठी राज्यात ४० हजार हेक्टर जमीन उद्योगांसाठी राखीव ठेवली आहे. नवीन उद्योग-पर्यावरणपूरक उद्योग कुठल्याही परवानगीशिवाय सुरू करण्यास मान्यता देत आहोत. यापुढे नवीन उद्योजकांना अटीशर्तीचा अडथळा येणार नाही. नवीन उद्योजक येणार असतील तर त्यांना भाडेतत्त्वावर जमीन देण्यात येईल. त्यांना मूलभूत सुविधा देणार असून, नवीन उद्योग पर्व सुरू करणार आहोत, असेही ठाकरे म्हणाले.

हिरवे क्षेत्र करोनामुक्त ठेवण्याचे व लाल क्षेत्र लवकरात लवकर हिरव्या क्षेत्रात आणण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. हिरव्या क्षेत्रात उद्योग सुरू होत आहेत. त्या ठिकाणी कामगारांची गरज भासणार आहे. महाराष्ट्रातील भूमिपुत्रांनी या संधीचा फायदा घ्यावा. आत्मनिर्भर महाराष्ट्रासाठी तुम्ही पुढे या व उद्योग क्षेत्रात काम करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

‘करोनासोबत जगायला शिका, असे अनेकजण सांगत आहेत. त्यामुळे घरात रहा, सुरक्षित राहा हे आपण आतापर्यंत पाळले. आता घराबाहेर राहताना सुरक्षित राहा हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे’, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

शाळा-महाविद्यालयांबाबत विचार सुरू

करोनाचे हे संकट पावसाळ्यापूर्वी संपवायचे आहे. जून महिन्यात शाळा, महाविद्यालय प्रवेशाचा विचार करता, करोना नियंत्रणात आणायचा आहे. शाळा-महाविद्यालये कशी सुरू करायची याबाबत विचार सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

परप्रांतीय-कोकणवासीयांनी धीर धरावा

आतापर्यंत पाच लाख परप्रांतीय मजुरांना रेल्वे व बसने त्यांच्या राज्यात पाठवले आहे. मजुरांनी रस्तावरून चालू नये, तुमच्यासाठी सर्व सुविधा दिल्या आहेत. रस्त्यावर चालू नका. तुमच्यासाठी वाहनांची सुविधा सुरू झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासन यासाठी काम करत आहे. त्यामुळे धीर धरा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. तसेच उन्हाळ्यात आंबा-फणस आदींचा आस्वाद घेण्यासाठी व गावातील आपल्या घरी जाण्यासाठी मुंबई-पुण्यातील कोकणवासीयांना कोकणात जाण्याची घाई आहे. पण त्यांनीही धीर धरावा. मुंबईतून कळत-नकळत करोना घेऊन कोकणात जाऊ नका, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

इतर राज्यांत अनेक सवलती

कर्नाटक  सर्व दुकाने, राज्य परिवहन बससेवेला परवानगी. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, केरळ या राज्यांमधील नागरिकांना मात्र प्रवेशबंदी.

दिल्ली  दुकानांसाठी सम-विषय प्रयोग. खासगी कार्यालयांना परवानगी.

तेलंगण हैदराबाद वगळता इतरत्र दुकाने खुली. राज्य परिवहन सेवा सुरू. सरकारी कार्यालयांमध्ये १०० टक्के  उपस्थिती

पश्चिम बंगाल अनेक निर्बंध शिथील. २७ मेपासून आंतरजिल्हा बससेवा. रात्रीची संचारबंदी लागू नाही.

केरळ अतिसंक्रमित क्षेत्रे वगळता जिल्ह्यंतर्गत सार्वजनिक वाहतुकीस परवानगी.

पंजाब निम्म्या प्रवाशांसह ठराविक मार्गावर बुधवारपासून बससेवेस मुभा