दिल्लीतील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली-मुंबई हवाई तसेच रेल्वे प्रवासावर र्निबध घालण्याचा विचार राज्य शासनाच्या विचाराधीन आहे.

दिल्लीत करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढली. दिल्लीहून दररोज हजार लोक हवाई किंवा रेल्वे मार्गे मुंबई तसेच राज्याच्या विविध भागांमध्ये येत असतात. या परिस्थितीत राज्यातील रुग्ण संख्या वाढू शकते. मुंबई किंवा राज्यातील रुग्ण संख्या वाढल्यावर दिल्ली सरकारने मुंबई-दिल्ली प्रवासावर र्निबध घातले होते. दिल्लीतील रुग्ण वाढल्याने दिल्ली-मुंबई प्रवासावर र्निबध घालण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आहे.

दिल्लीतील रुग्णसंख्येचा आढावा घेतला जात आहे. दिल्लीतील प्रादुर्भाव जास्तच वाढल्यास प्रवासावर र्निबध घातले जातील, असे राज्य शासनातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले.

मुंबईत हजारांवर रुग्ण

दिवाळीनंतर करोना रुग्णसंख्या वाढीची भीती व्यक्त केली गेली होती. ती सार्थ ठरताना दिसत आहे. शहरात शुक्रवारी १०३१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवाळीनंतर पालिकेने मुंबईतील चाचण्यांची संख्याही वाढवण्यास सुरुवात केली आहे.

राज्यात एक कोटी चाचण्यांचा टप्पा पार

राज्याने शुक्रवारी एक कोटी करोना चाचण्यांचा टप्पा ओलांडला. राज्यात शुक्रवारी ६,९४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या १६ लाख ४२ हजार ९१६ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८९ टक्के झाले आहे. राज्यात २४ तासांत ५,६४० नव्या रुग्णांचे निदान झाले आणि १५५ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्याचा मृत्यूदर २.६३ टक्के आहे.

रुग्णवाढ किती?

गेल्या चोवीस तासांमध्ये दिल्ली (७५४६), केरळ (५७२२), महाराष्ट्र (५५३५), पश्चिम बंगाल (३६२०), राजस्थान (२५४९) या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक करोना रुग्ण आढळले आहेत. राज्यात १५५ जणांचा मृत्यू झाला. दिवाळीनंतर मुंबई व पुण्यातील रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

सीरमची कोविशिल्ड लस ५०० ते ६०० रुपयांत

ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोविशिल्ड लस ५०० ते ६०० रुपयांना उपलब्ध करण्यात येईल असे सूतोवाच सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी एका कार्यक्रमात केले.

लसीकरण धोरणाचा आढावा

नवी दिल्ली : लोकसंख्येतील गटांचा प्राधान्यक्रम, आरोग्य सेवकांशी संपर्क, शीतगृह सोयींमध्ये वाढ आणि लस टोचणाऱ्यांची संख्या वाढवणे आदी मुद्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आढावा घेतला. लसीकरण धोरणाबाबत मोदी यांनी बैठक घेतली.