पंजाब, आसाम आणि मिझोराम करारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजाविणारे आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेचा फेरआढावा घेऊन व्यापक बदल सुचविणारे माजी केंद्रीय गृहसचिव तसेच राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान (९२) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि विवाहित कन्या असा परिवार आहे.

प्रधान यांनी १९५२ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (आय.ए.एस.) प्रवेश केला होता. केंद्र सरकारमध्ये गृह, संरक्षण, व्यापार विभागांचे सचिव, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खासगी सचिव, संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्ती, अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल आणि विधान परिषदेची आमदारकी अशी विविध पदे त्यांनी भूषविली होती. २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. या समितीच्या अहवालानंतर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, उपकरणे राज्य सरकारने खरेदी केली होती.

केंद्रात गृहसचिवपदी असताना पंजाब, आसाम आणि मिझोराम हे तीन शांतता करार करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यांच्या या कामगिरीमुळेच केंद्राने त्यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव केला.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते. यातूनच त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि काँग्रेसने त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली होती. १९९८ मध्ये राज्यसभेसाठी राज्यातून काँग्रेसने उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली आणि त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसमधील शरद पवार समर्थक आमदारांना नोटीस बजावीत दिल्लीला पाचारण केले होते. त्यामुळे काँग्रेस नेतृत्व आणि पवार यांच्यातील कटुता वाढत गेली. यातूनच पुढे राष्ट्रवादीची स्थापना झाली.

राम प्रधान यांच्या निधनाने महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील एक बुद्धिमान आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व हरपले. पंजाब प्रश्न अतिशय संयमाने, संवेदनशीलतेने आणि अभ्यासपूर्वक हाताळण्याचे मोठे कार्य त्यांनी केले होते.

– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून माझा राम प्रधान यांच्याशी परिचय होता. मागील अनेक वर्षे मी त्यांच्या नियमित संपर्कात होतो व वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शनही घेत होतो. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतरची परिस्थिती हाताळण्यात त्यांनी मोठे सहकार्य केले होते.

अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री