विकासकाविरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी वणवण

( जयेश शिरसाट )मुंबई : गुन्हा नोंदवून घेण्यात पोलिसांकडून कशी टाळाटाळ केली जाते, याचा अनुभव नागरिकांना अनेकदा येत असतो. मात्र, पोलिसांच्या उडवाउडवीच्या ‘चक्रव्युहा’तून एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचीही सुटका होऊ शकलेली नाही. घर खरेदीसाठीची ४० टक्के रक्कम भरूनदेखील १५ वर्षांपासून घराचा ताबा न देणाऱ्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी या माजी निरीक्षकाला तब्बल तीन वर्षे पोलीस ठाण्यात हेलपाटे घालावे लागले. अखेर गेल्या महिन्यात त्यांची तक्रार दाखल करून घेत विकासकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवाजी नगर पोलीस ठाण्यातून २०१०मध्ये निवृत्त झालेले गनी मुजावर (६६) यांनी कुर्ला पोलीस ठाण्यात नेमणूक असताना २००५मध्ये याच भागातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घर खरेदीचा निर्णय घेतला. १२ लाखांच्या एकूण रकमेपैकी पाच लाख रुपये त्यांनी विकासकाला सुपूर्दही केले. मात्र, आजतागायत त्यांना घराचा ताबा मिळालेला नाही. विक्रीकिमतीच्या ४० टक्के रक्कम अदा केल्यानंतर विकासकाकडून घरनोंदणी करार होणे आवश्यक होते. मात्र, विकासकाने ‘आज करू, उद्या करू’ असे सांगत मुजावर यांना  झुलवत ठेवले. तर ते पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर त्याने सरळ हात वर करण्यास सुरुवात केली.

मुजावर यांनी वकिलाकरवी मुजावर याला तीन कायदेशीर नोटिसा धाडल्या. मात्र, विकासकाने एकाही नोटिशीला उत्तर दिले नाही. अखेर मुजावर यांनी २०१४मध्ये कुर्ला पोलीस ठाणे गाठले. परंतु, ‘या तक्रारीनुसार गुन्हा नोंद होऊ शकत नाही’ असे उत्तर त्यांना मिळाले. दोन वर्षे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हेलपाटे घालूनही गुन्हा नोंद न झाल्याने २०१६मध्ये मुजावर यांनी तत्कालिन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कैफियत मांडली. पडसलगीकर यांच्या आदेशानंतर कुर्ला पोलिसांनी मुजावर यांचा जबाब नोंदवून घेतला. मात्र, विकासकावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.

हा दिवाणी स्वरुपाचा गुन्हा आहे, असे पोलिसांचे म्हणणे होते. अखेर एका प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत दाखवल्यानंतर कुर्ला पोलिसांनी गेल्या महिन्यात २७ जून रोजी विकासकाविरोधात मोपा कायद्यातील कलम चार आणि भारतीय दंड संहितेतील फसवणूक, अपहार या कलमान्वये गुन्हा नोंदवला.

‘स्वप्न अजूनही अधुरे’

निवृत्तीनंतर पोलीस वसाहत सोडवी लागणार या विचाराने आधीच हक्काच्या घराची तजवीज केली होती. मात्र हक्काच्या घरात राहाण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. देवनार परिसरात भाडय़ाच्या खोलीत पत्नी, विवाहित मुलगा, सून आणि नातवंडांसोबत वास्तव्य करावे लागत आहे. तीन दशके पोलीस दलात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले. फसवणूक झाल्यानंतर पोलिसांकडून सहानुभूती मिळेल, न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. पण तीन वर्षे पाठपुरावा करावा लागला, अशी प्रतिक्रिया मुजावर व्यक्त करतात.

‘गुंतागुंतीमुळे विलंब’

कुर्ला पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मुजावर यांच्या तक्रारीवर विकासकाविरोधात गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केल्याचे सांगितले. काही गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये तक्रारीतील तथ्यता पडताळावी लागते. गुन्हा नोंदवल्यानंतर तपासातून निष्पन्न होणारी वस्तुस्थिती, वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.