राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी आगामी काळात होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. राज्यातील सत्तेत तीन पक्षांची आघाडी असल्यामुळे निवडणुकीबाबत शिवसेना व काँग्रेसच्या नेत्यांशीही चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांची व मंत्र्यांची शरद पवार यांनी बैठक घेतली. बैठकीला जयंत पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री संजय बनसोडे, दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते.

अजित पवारांना विश्रांतीचा सल्ला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अजित पवारांना करोना झाला की नाही याबाबत काही माहिती आलेली नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

खडसे यांचा आज प्रवेश

भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचा उद्या शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ांतील त्यांचे समर्थकही पक्षात प्रवेश करणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले. खडसे यांच्या पुनर्वसनाबाबत कोणी चिंता करू नये, असे ते म्हणाले.