गेली पाच वर्षे न मिळालेली भाडेवाढ आणि करोनामुळे बसलेला आर्थिक फटका पाहता रिक्षा, टॅक्सीचालकांना भाडेवाढ करण्यास मंजुरी देण्याचा विचार करण्यात येत आहे. रिक्षासाठी दोन रुपये, तर टॅक्सीसाठी तीन रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय होईल.

२२ डिसेंबर २०२० रोजी मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली होती. त्यामध्ये विविध विषयांबरोबरच भाडेवाढीवरही चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र त्या वेळी ही चर्चा पुढे ढकलण्यात आली. आता येत्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत रिक्षा व टॅक्सी भाडेवाढीवर चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली.

खटुआ समितीच्या शिफारशींनुसार भाडेवाढ

यापूर्वी हकीम समितीच्या सूत्रानुसार प्रत्येक वर्षी जूनमध्ये रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ होत होती. या भाडेवाढीबाबत प्रवाशांनी अनेकदा नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर शासनाने हकीम समिती बरखास्त करून त्याऐवजी एक सदस्यीय खटुआ समिती स्थापन केली.  या समितीने ऑक्टोबर २०१७ मध्ये ३०० पानी अहवाल सादर केला होता. हा अहवाल स्वीकारण्यास काही कालावधी लागला. या समितीच्या काही शिफारशी लागू केल्या आहेत. मात्र भाडेदराशी संबंधित शिफारसी लागू झालेल्या नाहीत. त्याच समितीच्या शिफारशींनुसार रिक्षा-टॅक्सीचालकांना भाडेवाढ देण्याची तयारी सुरू आहे.

संघटनांमध्ये मतभेद

टाळेबंदी शिथिलीकरणानंतर रिक्षा, टॅक्सी सेवा सुरू झाल्या, परंतु या सेवांना अजूनही चांगला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे भाडेवाढ झाल्यास प्रवासी दुरावतील, अशी भीती काही रिक्षा, टॅक्सी संघटनांनी व्यक्त करत सध्या भाडेवाढ नको, अशी मागणी केली आहे. तर काही संघटनांची मात्र भाडेवाढ करण्यात यावी अशी मागणी आहे. संघटनांमध्ये एकमत नसल्याने भाडेवाढ करावी की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत शासन आहे.

* सध्या रिक्षाचे किमान भाडे १८ रुपये आणि टॅक्सीचे भाडे २२ रुपये आहे.

* भाडेवाढ झाल्यास रिक्षाचे भाडे २० रुपये आणि टॅक्सीचे भाडे २५ रुपये होईल.

* राज्यात रिक्षांची संख्या आता १२ लाखांपर्यंत पोहोचली आहे, तर मुंबईत ती दोन लाखांहून अधिक आहे.

* मुंबई महानगरातही सव्वातीन लाख रिक्षा आहेत. मुंबईत काळ्या-पिवळ्या टॅक्सींची संख्याही ४८ हजारांपर्यंत पोहोचली आहे.