२०१८ मध्ये १६५ जणांनी जीव गमावला, मुंबईचा क्रमांक दुसरा

दुचाकीस्वारांच्या अपघातांत राज्यात २०१८मध्ये सर्वाधिक मृत्यू ठाणे शहरात झाले, तर या बाबतीत मुंबई शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठाणे शहरात दुचाकी अपघातांत २०१८ मध्ये १६५ जणांचा मृत्यू झाला, तर मुंबईत १२७ जणांनी प्राण गमावले. त्याखालोखाल पुणे, नागपूर, नाशिक आणि नवी मुंबई शहरातही दुचाकीचालकांचे अपघात मोठय़ा प्रमाणावर होत आहेत, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, अतिवेगाने दुचाकी चालवणे, अन्य वाहनांना मागे टाकण्याचा प्रयत्न करणे, मद्यपान करून वाहन चालवणे, योग्य प्रशिक्षण नसतानाही दुचाकी चालवणे इत्यादी कारणामुळे दुचाकीस्वार जीव गमावतात किंवा गंभीर जखमी होतात, असे महामार्ग पोलिसांनी सांगितले. बहुतांश अपघातांमध्ये दुचाकीस्वारांची चूक असतेच पण अनेकदा समोरून किंवा मागून येणाऱ्या वाहनचालकांच्या चुकीमुळेही दुचाकीस्वारांना प्राण गमवावे लागतात. रस्त्यावरील खड्डे चुकवण्याचा प्रयत्नांतही अनेक दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू होतो. हेल्मेट न वापरल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन बहुसंख्य दुचाकीस्वारांना प्राणास मुकावे लागते, असेही पोलिसांनी सांगितले.