दक्षिण मुंबईत ईदचा दिमाख काही वेगळाच असतो. लाखो नागरिक आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी तर अनेक खवय्ये मोहम्मद अली मार्गाकडे कूच करतात. याचाच फायदा चोर-लुटारू करून घेत असल्याचे दिसून येते. ईदच्या निमित्ताने कमाई करण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून मोठय़ा प्रमाणावर टोळ्या मुंबईत दाखल झाल्या असून त्याचा फटका दक्षिण मुंबईबरोबरच मुंबईकरांना बसण्याची शक्यता आहे. मंगळवारीच डोंगरी पोलिसांनी मोबाइल चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले असून अशा प्रकारच्या अनेक टोळ्या कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
डोंगरी परिसरात ईदच्या नावाने चंदा मागत फिरणारे, उघडय़ा घरात शिरुन भ्रमणध्वनी चोरणाऱ्या तसेच सिग्नलवर उभ्या गाडय़ांमधून सामान चोरणाऱ्या दिल्लीतील एका टोळीला डोंगरी पोलिसांनी मंगळवारी जेरबंद केले. या टोळीकडून पोलिसांना २२ स्मार्टफोन आणि तीन टॅब हस्तगत केले आहेत. गर्दीमध्ये झोळी घेऊन भीक मागत असल्याचे भासवत तसेच साध्या वेषातील पोलीस बनून लोकांकडून पैसे-दागिने उकळण्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. ईद नातेवाईकांबरोबर साजरी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर मुस्लीम बांधव दक्षिण मुंबईत येताना दिसतात. त्यातही रोज इफ्तारनंतर मोहम्मद अली मार्गावर लागणाऱ्या खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सवर खवय्यांची गर्दी झालेली दिसून येते. याचाच फायदा घेण्यासाठी टोळ्या दाखल झाल्या असून त्यांच्यापासून मुंबईकरांनी सावध राहावे, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.
ईदच्या दिवशीही पाकीटमारी, फसवणूक असे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे पोलिसांनी दक्षिण मुंबईत मोठय़ा प्रमाणावर बंदोबस्त ठेवला आहे, असे दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रताप दिघावकर यांनी स्पष्ट केले. ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्याबरोबरच पोलिसांच्या गाडय़ांवर लावण्यात आलेल्या ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीसीटीव्हींचीही मदत आम्ही घेत असून नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. मुंबईतील दक्षिण मुंबई ही नेहमीच संवेदनशील मानली जाते. त्यामुळे नागरिकांना काही संशयित व्यक्ती अथवा वस्तू दिसल्या तर त्याची माहिती तातडीने पोलिसांना द्या, असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त दिघावकर यांनी केले.