रा. स्व. संघाच्या कोकण प्रांत संघचालकांची माहिती

येत्या विजयादशमीपासून संघाचे स्वयंसेवक ‘हाफ पॅण्ट’ऐवजी तपकिरी रंगाच्या ‘फुल पॅण्ट’मध्ये दिसतील, अशी माहिती रा. स्व. संघाच्या कोकण प्रांताचे संघचालक डॉ. सतीश मोढ यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक नुकतीच राजस्थानमधील नागोर येथे पार पडली. या प्रतिनिधी सभेत आरोग्य, शिक्षण आणि समतापूर्ण आचरण हे तीन ठराव मजूर झाले असल्याचेही डॉ. मोढ यांनी सांगितले.

शिशू व माता यांचे आरोग्यरक्षण, कुपोषण, व्यसनमुक्ती याबाबत सर्व संघ स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, शासन यांनी समाजजागरण करावे, देशातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी उद्योगसमूह, सामाजिक संस्था, दानशूर न्यास यांनी पुढाकार घ्यावा, दर्जेदार व स्वस्त शिक्षण उपलब्ध करून द्यावे, संघ स्वयंसेवक आणि नागरिकांनी तसेच सामाजिक व धार्मिक संघटनांनी सामाजिक समरसता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, हे तीन ठराव मंजूर झाले असल्याचे ते म्हणाले.

ओवेसीने केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, ते त्यांनाच विचारा असे सांगून ही ‘महान’ नेते मंडळी काय काय बोलत असतात. रा. स्व. संघाचे सरसंघचालक यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व देशभावना वाढीस लागण्याच्या उद्देशाने ‘भारत माता की जय’ ही घोषणा देण्याबाबत सांगितले होते, असे उत्तर देऊन या विषयावर अधिक भाष्य केले नाही.

यंदा ५ हजारांहून अधिक शाखांची भर

देशभरातील संघकार्यात भरीव वाढ होत आहे. २०१२ मध्ये संपूर्ण देशभरात संघाच्या ४० हजार ९२२ शाखा होत्या. २०१५ मध्ये त्यांची संख्या ५१ हजार ३३५ होती तर यंदाच्या वर्षांत त्यात ५ हजार ५२४ शाखांची भर पडली आहे. संघाचे काम समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘जागरण’पत्रिका प्रकाशित केली जाते. देशभरातील २ लाख ६५ हजार गावांमध्ये त्याचे वितरण होत आहे. सेवाकार्य हे संघाचे महत्त्वाचे काम असून देशभरात एकूण १ लाख ५२ हजार ३८८ सेवाकार्ये सुरू आहेत. यात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास, वनवासी विकास आणि अन्य क्षेत्रांचा समावेश असल्याची माहितीही त्यांनी दिली.