सुप्रिया दाबके

मॅरेथॉनसाठी मुंबई सज्ज; ५५ हजार स्पर्धकांचा सहभाग

girl Bangladesh sexually assaulted,
डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात दोन भावांकडून बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
MS Dhone fan buys 64000 tickets
मुलीच्या शाळेची फी भरली नाही, पण धोनीच्या चाहत्याने IPL तिकीटासाठी ६४ हजार खर्च केले
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….
Record Number of Students Register for MHTCET
अभियांत्रिकी, औषधनिर्माण प्रवेशासाठी स्पर्धा, सीईटीसाठी किती विद्यार्थ्यांची नोंदणी?

मुंबई मॅरेथॉनप्रमाणे अनेक शर्यतींमध्ये धावायचे कशासाठी?.. तर पोटासाठी! हे वास्तव आहे परभणीच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील किरण मात्रे आणि अनेक वर्षांपासून धावपटू म्हणून ओळख असलेल्या ज्योती गवते यांचे.

तंदुरुस्त राहण्याच्या वेडामुळे मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्यांची संख्या एकीकडे विक्रमी वेगाने वाढत असताना शर्यती जिंकून घर चालवण्याची किरण आणि ज्योती यांच्यासारख्या काही धावपटूंची ‘संघर्षधाव’ लक्षवेधी ठरते.

आज मुंबईत होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेत हे दोघेही धावपटू ५५ हजार स्पर्धकांसह आपले कौशल्य आजमावणार आहेत. अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक रवी रासकटला यांच्या मार्गदर्शनाखाली १९ वर्षीय किरण आणि ३२ वर्षीय ज्योती मॅरेथॉनमध्ये धावून कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवत आहेत. परभणी जिल्ह्य़ातील किरणच्या कुटुंबाची गावात म्हणजे त्रिधारावाडीत पाच एकर शेती आहे. मात्र दुष्काळामुळे गेली अनेक वर्षे शेतीतून कोणतेच उत्पन्न मिळत नाही. किरण, कृष्णा आणि कांचन अशी ही तीन भावंडे. घर चालवायचे कसे या विवंचनेतून किरणच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली. किरण तेव्हा पहिल्या इयत्तेत होता. त्यानंतर काही महिन्यांनी आईचेही निधन झाले आणि या कुटुंबावर आभाळ कोसळले. किरणच्या काकांना हे दु:ख अनावर झाल्याने त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले. त्यामुळे या तीन मुलांची जबाबदारी आजी-आजोबांवर आली. या कठीण काळात शालेय शिक्षण घेताना किरण मॅरेथॉन स्पर्धामध्ये सहभागी होऊ लागला. परंतु अचानक त्याच्या आजोबांनी आत्महत्या केल्यामुळे त्याचा एकमेव आधारवड हरपला. पण किरण डगमगला नाही. उलट ‘जेव्हा धावतो, तेव्हा दु:ख विसरण्यास मदत होते,’ असे म्हणत तो विविध स्पर्धा जिंकू लागला. औरंगाबाद, पुणे, हैदराबाद अशा विविध मॅरेथॉनमध्ये किरणने बक्षिसे मिळवली.

माजी मुंबई मॅरेथॉनविजेती ज्योती गवतेचा संघर्षही प्रेरणादायी आहे. एसटी महामंडळात सफाई कामगार म्हणून नोकरी करणारे तिचे वडील काही वर्षांपूर्वी निवृत्त झाले. अनेक वर्षे ती कुटुंबासह १० बाय १०च्या झोपडीत राहत होती. मॅरेथॉनमध्ये धावून जिंकलेल्या बक्षिसांच्या रकमेतून ज्योतीने आता पक्के घर बांधले आहे. ज्योती आजही कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी मॅरेथॉनमध्ये धावते. गेल्या वर्षी काठमांडूतील दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत (सॅफ) तिने कांस्यपदकही जिंकले. गेली १० वर्षे मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या ज्योतीला कुटुंबाच्या स्थैर्यासाठी नोकरीची आवश्यकता आहे.

दु:ख विसरण्यासाठी.. 

दुष्काळामुळे शेतातून कोणतेही उत्पन्न मिळत नसल्याने आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबातील किरण शालेय शिक्षण घेत असल्यापासून धावू लागला. घरातील दु:खाची परिस्थिती विसरण्यासाठी त्याला खेळाने मदत केली. पुढे या खेळातील पारितोषिकांच्या रकमेतून घर चालविण्यास हातभार लागल्याने त्याचा हुरूप वाढला.  ज्योती गवते हिचे वडील एसटीमध्ये सफाई कामगार म्हणून निवृत्त झाले असून, आपल्या झोपडीमध्ये तिने क्रीडापटू बनण्याच्या स्वप्नांना फुलविले.

किरणची २०२४ ऑलिम्पिकमध्ये सहभागाची इच्छा आहे. परिस्थितीमुळे तो लहान वयातच प्रगल्भ झाला आहे. परंतु जागतिक स्पर्धेतील सहभागासाठी त्याला आर्थिक पाठबळाची गरज आहे.

– रवी रासकट, किरणचे प्रशिक्षक