आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीवर आळीमिळी गूपचिळीच्या भूमिकेत असलेल्या मास्टरब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपले मौन शुक्रवारी सोडले. गेल्या दोन आठवड्यात घडलेल्या घटना या धक्कादायक आणि निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया सचिनने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर व्यक्त केली.
क्रिकेट हा खेळ चुकीच्या गोष्टींमुळे जेव्हा चर्चेत येतो, त्यावेळी खूप वाईट वाटते, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून १६ मे रोजी राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी देशातील विविध ठिकाणांहून एकूण २८ सट्टेबाजांना अटक केली. अभिनेता विंदू दारा सिंग आणि चेन्नई सुपर किंग्जचा टीम प्रिन्सिपल गुरुनाथ मयप्पन यालाही पोलिसांनी सट्टेबाजीच्या आरोपांवरून अटक केली. या सगळ्या घडामोडींनंतर पहिल्यांदाच सचिन तेंडुलकरने या विषयावर सावध भाष्य केले आहे.