मालकाविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल नाही
साकीनाका येथील केकेडी कंपाऊंडमधील माही इंडस्ट्रीजमध्ये झालेला स्फोट हा तापमानात कमालीची वाढीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे तापमान २०० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक गेल्यानेच स्फोट झाला. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबत तज्ज्ञांच्या अहवालाची वाट पाहत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या दोघांची प्रकृती सुधारीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही जागा मूळ ऑस्कर नावाच्या इसमाची होती. बेकायदेशीररीत्या बांधण्यात आलेल्या एकमजली कारखान्यात अल्युमिनिअम फॉईल बनविले जात होते. हा कारखाना कधीच बंद नसतो. हे बेकादेशीर असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या जागेत प्रवीण व किरण देढीया हे भाडय़ाने कारखाना चालवित होते. त्यांच्यावर निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो. परंतु पोलिसांनी अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. याबाबत तपास अधिकारी सुधीर दळवी यांनी सांगितले की, आम्ही तज्ज्ञांच्या अहवालाची वाट पाहत आहेत. हा अहवाल मिळताच संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कारखान्याशेजारी अवघ्या पावणेदोनशे चौरस फूट जागेत पटेल कुटुंबीय राहत होते. ही जागा मूळची किरण गांधी यांची होती. परंतु त्यांचे निधन झाल्यानंतर तेथे पटेल कुटुंबीय राहत होते. स्फोटाचा हादरा इतका जबरदस्त होता की, या खोलीचे अस्तित्वच नाहीसे झाले आहे. या परिसरात इतकी बेकायदा बांधकामे आहेत की, जेसीबी नेण्यासाठीही तब्बल दोन तासांचा कालावधी लागल्याचे पोलिसांनी सांगितले.