मुंबईत मे आणि जून महिन्यात लोकांना पाणी कपातीचा सामना करावा लागतो. पाणी कपातीचं हे संकट टाळण्यासाठी मनोर येथील समुद्राचे २०० एमएलडी खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. निःक्षारीकरणाच्या प्रकल्प उभारीकरणाचा आढावा घेऊन पुढील प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला सातत्याने पाऊस उशिरा येत असल्याने मे आणि जून महिन्यांमध्ये मुंबईत १० ते १५ टक्के पाणी कपात करावी लागते. ही बाब टाळण्यासाठी समुद्रातील खारे पाणी आता गोडे करण्यात येणार आहे.

यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची उपस्थिती होती.

जगातील अनेक देशांमध्ये समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. तर काही देशांमध्ये अशा प्रकल्पांची उभारणी सुरु आहे. मुंबईसारख्या महानगरात हा प्रकल्प नक्कीच लाभदायक ठरणार आहे. त्यामुळेच या प्रकल्पासाठी करण्यात येणारी कार्यवाही पुढे सुरु ठेवणार असल्याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

“महाराष्ट्राला मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी लागणारे पाणी उपलब्ध असणार आहे. सौर उर्जेवर हा प्रकल्प राबविल्यास निर्मितीचा खर्चही कमी होणार आहे. मनोर येथील पाण्याची गुणवत्ता चांगली आहे. पायाभूत सुविधा सहज उपलब्ध होऊ शकतात. मनोर येथे शासनाचा भूखंड आणि रस्तेही उपलब्ध आहेत. या ठिकाणी नागरी वसाहत नसल्याने हा प्रकल्प विना व्यत्यय पूर्ण होऊ शकतो. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना कपातीविना पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.