वारंवार इशारा देऊनही रस्त्यांवरील खड्डे बुजविले जात नसतील, तर त्याचे गंभीर परिणाम होतील. दिलेल्या मुदतीत मुंबई खड्डेमुक्त झाली नाही, तर आता अभियंत्यांसोबत पालिका आयुक्तांनाही खड्डय़ात उभे केले जाईल. मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा आपण तुरुंगात जाण्यास तयार आहोत, असा इशारा मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा गुरुवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दिला.

गेले चार दिवस पावसाचा मागमूस नसतानाही मुंबईमध्ये खड्डय़ांची स्थिती ‘जैसे थे’ आहे. न. चिं. केळकर मार्गावरील खड्डे बुजवावेत अन्यथा खड्डय़ामध्ये उभे करू, असा इशारा पूर्वी मुख्य अभियंत्यांना (रस्ते) दिला होता. मात्र तरीही खड्डे बुजविण्यात आले नाहीत. त्यामुळे मुख्य अभियंते (रस्ते) संजय दराडे यांना खड्डय़ात उभे करावे लागले होते. त्यानंतर ४,२०० अभियंते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सामूहिक राजीनामा देत आंदोलन केले.

संजय दराडे यांना खड्डय़ात उभे केल्यामुळे संदीप देशपांडे यांना दोन दिवस कारागृहात जावे लागले. तेथील परिस्थितीचा अंदाज आला आहे आणि आता तुरुंगात जाण्याविषयी मनात कोणतीच भीती राहिलेली नाही. त्यामुळे या वेळी दिलेल्या मुदतीत रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत, तर संबंधित अभियंत्यांबरोबर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनाही खड्डय़ात उभे करण्यात येईल. मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळावेत यासाठी आणखी काही दिवस तुरुंगात जाण्यास आम्ही तयार आहोत, असे संदीप देशपांडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट केले.