शुक्रवारी राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला. मुंबईमध्येही करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईमधील आरोग्य यंत्रणा सुसज्ज असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र विरोधी पक्षांकडू मुंबईमधील रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली जात आहे. तसेच शहरातील सरकारी रुग्णालयांच्या दुर्वावस्थेसंदर्भातही विरोधी पक्षाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना थेट फोडून काढण्याचा इशारा दिला आहे.

मुंबईसमोर करोनासारखे मोठे संकट उभं असतानाच महापालिकेचे काही अधिकारी आपले खिसे भरत असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. मात्र याच ट्विटमध्ये त्यांनी अशा अधिकाऱ्यांना थेट मनसे स्टाइल इशारा दिला आहे. “सध्या महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली स्वतःच्या तुमड्या भरून घेत आहेत त्यांना एकच इशारा आहे तुमच्यावर आमची करडी नजर आहे. हे करोना चे संकट गेलं की तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय हा महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही,” असं देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच देशपांडे यांनी शहरातील रुग्णालयांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना रुग्णालयामध्ये बेड मिळत नसल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत हे सांगताना देशपांडे भावूक झाले होते. “सरकारी रुग्णालयांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीय. रुग्णांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. माझ्या ओळखीतील एका काकांनी सकाळी १९१६ ला फोन केला. मात्र रात्रीपर्यंत त्यांना बेड उपलब्ध झाला नाही. आणि आज सकाळी सहा वाजता त्या काकांचा मृत्यू झाला,” हे सांगताना देशपांडे यांच्या भावनांचा बांध फुटला आणि ते ऑन कॅमेरा रडू लागल्याचे दिसून आलं होतं. डोळे पुसत स्वत:ला सावरत त्यांनी लोकं आपल्याला संपर्क करत असल्याची माहिती दिली. “रुग्णालयाचे अधिकारी फोन उचलत नाहीत. ८०० बेड आहेत हजार बेड आहेत असं खोटं सांगितलं जातयं. इथे आयसीयूमध्ये साधा एक बेड मिळत नाहीय,” असा आरोप देशपांडे यांनी केला होता.

नुसतं गोड बोलून काही होणार नाही

“कोविड झालेल्यांची अवस्था वाईट आहेच. मात्र त्याचबरोबरच ज्यांना कोविड झाला नाहीय, ज्यांची फक्त शुगर वाढली आहे किंवा इतर त्रास आहे त्यांनाही बेड मिळत नाहीय. प्रशासनाला मी हात जोडून विनंती करेन की त्यांनी काहीतरी ठोस पाऊल उचललं पाहिजे. कारण नुसतं गोड बोलून काहीही होणार नाहीय,” असंही देशपांडे यांनी यावेळी म्हटलं होतं.