शिवसेना पक्षप्रमुख काहीही सांगत असले तरी ‘पहले सरकार फिर मंदिर’ हीच त्यांची खरी भूमिका असल्याचा हल्ला उद्धव यांच्या अयोध्या दौऱ्यावर बोलताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर रविवारी कागदी होडय़ा सापडल्या असून शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी काल आरती झाल्यावर आपल्या खिशातील राजीनाम्याच्या कागदी होडय़ा करून शरयूत सोडल्या होत्या असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपवर नोटाबंदी, जीएसटीपासून ते शेतकरी आत्महत्यांपर्यंत टोकाची टीका करणाऱ्या शिवसेनेला भाजपबरोबर युती करणे अवघड असल्यामुळे राम मंदिराच्या नावावर एकत्र येण्यासाठी अयोध्या दर्शन ही एक चाल असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे भाजपला उद्देशून म्हणाले होते, ‘निर्लज्जांनो राम मंदिर तुम्ही बांधता की आम्ही बांधू’, त्यामुळे अयोध्येत गेल्यावर ते राम मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ केल्याशिवाय मुंबईला परत येणार नाहीत, असाच अनेकांचा समज होता. परंतु ते तर केवळ सहकुटुंब, सहपरिवार तीर्थयात्रेला गेल्याचे दिसून आले, असेही विखे-पाटील म्हणाले. मंदिर बांधण्याच्या मुद्दय़ावरून ठाकरे यांनी घूमजाव केले असून केंद्रातील भाजप सरकार त्यांना मंदिर बांधण्याची तारीखही देत नसताना ते सत्तेला चिकटून बसले आहेत.

अयोध्येत जाऊन आपण कुंभकर्णाला जागे करण्याचा प्रयत्न केला असे उद्धव यांचे म्हणणे आहे. मात्र कुंभकर्ण कोण हे सांगण्यास ते तयार नाहीत. ते सरकारला कुंभकर्ण म्हणत असतील तर केंद्रात व राज्यात दोन्ही ठिकाणी शिवसेना सत्तेत आहे. ते स्वत: सत्तेत असताना सरकारला जागे करणार म्हणजे काय करणार, असा सवालही विखे यांनी उपस्थित केला.

मंत्र्यांचे राजीनामे कधी?- निरुपम

मराठा, धनगर, मुस्लीम व लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पडून असताना उद्धव यांचा आयोध्या दौरा ही निव्वळ नाटक असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. मंदिराची तारीख भाजप कधी सांगेल तेव्हा सांगेल पण तुमचे मंत्री राजीनामा कधी देणार याची तारीख तरी सांगा, असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला.