रश्मी शुक्ला प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. आपल्याकडचे सर्व पुरावे त्यांना सादर देखील केले. मात्र, यावरून राज्यात सत्ताधाऱ्यांकडून संताप व्यक्त होताना दिसत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे. “देवेंद्र फडणवीसांनी वारंवार महाराष्ट्राची लक्ष्मणरेषा ओलांडू नये. काही गोष्टी घरातच राहायला हव्यात. पण जेव्हा वारंवार महाराष्ट्राचा नेता या मर्यादा ओलांडून दिल्लीकडे तोंड करून बघतो, तेव्हा सह्याद्रीही ओशाळतो”, अशा शब्दांत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावले आहे. त्यामुळे आता यावरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

रश्मी शुक्ला प्रकरणावरून वातावरण तापलं

रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगमधून अनेक पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेतली गेल्याचं समोर आलं आहे. मात्र, यावर राज्य सरकारकडून तीव्र आक्षेप घेतला गेला आहे. परवानगीशिवाय त्यांनी हे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधत झालेल्या कथित पोलीस भरती रॅकेटची चौकशी केली जाण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे.

“महाराष्ट्राची लक्ष्मणरेषा ओलांडू नये”

या मुद्द्यावर बोलताना संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना परखड शब्दांमध्ये सुनावले आहे. “रश्मी शुक्ला प्रकरणात विरोधी पक्षनेते तोंडावर पडले आहेत. त्यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्र्यांना भेटण्याची गरज नव्हती. त्यांनी त्यांची लढाई महाराष्ट्रातत ठेवायला हवी होती. त्यांनी वारंवार महाराष्ट्राची लक्ष्मणरेषा ओलांडू नये. काही गोष्टी घरातच राहायला हव्यात. जेव्हा वारंवार महाराष्ट्राचा नेता या मर्यादा ओलांडतो आणि दिल्लीकडे तोंड करून बघतो. सह्याद्री जेव्हा दिल्लीकडे बघतो, तेव्हा सह्याद्रीचं शिखर ओशाळल्यासारखं वाटतं. तुम्ही फक्त नागपूरचे नेते नाहीत. तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात. आम्ही तुमच्याकडे भविष्यातील राष्ट्रीय नेते म्हणून पाहातो”, असं राऊत म्हणाले.

कुणीही आघाडीत मिठाचा खडा टाकू नये; राऊतांच्या ‘रोखठोक’वरून अजित पवारांनी साधला निशाणा

“विरोधी पक्षनेते हे शॅडो मुख्यमंत्री असतात…”

“देवेंद्र फडणवीस हे अनुभवी नेते आहेत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद ५ वर्ष सांभाळणं हे फडणवीसांचं भाग्य होतं. तशी संधी त्यांना मिळाली. त्यातून त्यांनी उत्तम प्रकारे काम केलं. त्यातून त्यांना एक अनुभव मिळाला. हा अनुभव त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून देखील वापरायला हवा. विरोधी पक्षनेत्याने आक्रमक व्हावं. पण हा आक्रमकपणा राज्याच्या प्रतिष्ठेच्या मुळावर येईल इतका नसावा. चुका होतात. पण त्या सुधारण्याची संधी दिली पाहिजे. विरोधी पक्ष हे शॅडो कॅबिनेट असतं. विरोधी पक्षनेते हे शॅडो मुख्यमंत्री असतात. तुमच्या भाग्यात पुन्हा मुख्यमंत्री होणं असेल. पण असं ओढाताण करून ते मिळवता येत नाही”, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.