राज्यातील इतर मागासवर्गीयांनी आत्मसन्मानासाठी बौद्ध धम्माचा स्वीकार करावा, अशी ओबीसी धर्मातराची धाडसी चळवळ सुरु करणारे सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांचे (वय ६३) गुरुवारी मुंबईत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. बीड येथे उद्या दुपारी २ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  
बीड जिल्ह्यातील एका खेडय़ात जन्मलेले उपरे यांनी मोठय़ा कष्टाने उच्च शिक्षण घेतले. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी प्राध्यपकाची नोकरी करीत असतानाच त्यांनी सामाजिक व राजकीय चळवळीत प्रवेश केला. भारिप-बहुजन महासंघाचे ते काही काळ प्रदेशाध्यक्ष होते.
पुढे त्यांनी सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला. ओबीसी समाजाला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी आर्थिक, सामाजिक लढय़ाबरोबरच सांस्कृतिक परिवर्तनाची चळवळ केली पाहिजे, अशी त्यांची धारणा झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला प्रेरणास्थानी ठेवून त्यांनी १४ ऑक्टोबर २०११ पासून ओबीसी बांधव आता बुद्ध धम्माच्या वाटेवर, हे अभियान सुरु केले. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी ओबीसी धर्मातर जनजागृती परिषदा घेऊन आख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. त्याचा परिणाम म्हणून ओबीसीमधील विविध जातींमधील सुमारे साडे सहा हजार लोकांनी धर्मातरासाठी नोंदणी केली होती.   
पुढील वर्षी  १४ ऑक्टोबर २०१६ रोजी नागपूर येथे दीक्षाभूमीवर काही लाख ओबीसी धर्मातर करुन बुद्ध धम्माचा स्वीकार करतील असे त्यांनी उद्दिष्ट ठेवले होते. त्यासासाठी त्यांनी तयारी सुरु केली होती. मात्र ८ मार्च रोजी अचानकपणे मेंदुतील रक्तस्रावामुळे त्यांच्यावर आधी बीडमध्ये व नंतर औरंगाबादमधील खासगी रुग्णालयांत उपचार करण्यात आले. गेल्या आठवडय़ात त्यांना मुंबईत ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत किंचत सुधारणा होत असल्याचे दिसत असतानाच गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, संतोष, संदीप ही दोन मुले व दोन विवाहित मुली असा परिवार आहे. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.