महानंदा नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
ठाण्याची पुनरावृत्ती होण्याची रहिवाशांना भीती; न्यायालयाच्या आदेशाकडे एसआरएचीही डोळेझाक
निकृष्ट बांधकामामुळे इमारत कोसळून ७४ जणांचा बळी घेणाऱ्या ठाण्यातील इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती मुंबईतही होण्याची भीती निर्माण झाली आहे. कुल्र्यात झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट आणि कुचकामी असतानाही झोपु प्राधिकरण आणि बिल्डर जबरदस्तीने लोकांना या इमारतीचा ताबा घेण्यास भाग पाडीत आहेत. त्यामुळे आमचे संरक्षण करा, असे साकडे कुर्ला महानंदा नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घातले आहे.
शासनाच्या मालकीच्या जागेवर असलेल्या सुमारे सव्वाशे झोपडय़ांच्या पुनर्वसनासाठी तेथे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेस सन २००५मध्ये सुरुवात झाली. सर्व सोपस्कार झाल्यानंतर गगनगिरी इंटरप्रायझेस या विकासकासोबत करारनामा करण्यात आला. प्रारंभी झोपडपट्टीवासीयांसाठी तीन मजली इमारत बांधण्यात येत असल्याचे सांगत विकासकाने पाच ते सात फूट खड्डे मारून त्यावर इमारत उभारण्यास सुरुवात केली. मात्र हे काम  निकृष्ट असल्याचा संशय रहिवाशांनी व्यक्त केला. त्यानंतर सोसायटीने या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असता, त्यांनीही सदर इमारतीचे बांधकाम निकृष्ट असून इमारतीचे आयुर्मान १५ वर्षे असेल असा ठपका स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ठेवण्यात आला होता. त्यानंतर उच्च न्यायालयानेही या बांधकामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याचे आदेश झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणास दिले होते. मात्र प्राधिकरणाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही इमारत सहा मजल्यापर्यंत उभी राहिली.
 त्यानंतर या इमारतीमध्ये अनेक उणिवा असतानाही विकासकाने आता जबरदस्तीने रहिवाशांना या इमारतीमधील सदनिकांचा ताबा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र या इमारतीमध्ये काही सदनिकांमध्ये शौचालयाचे भांडे, संडास बाथरूमला दरवाजेच बसविलेले नाहीत. तसेच सर्वत्र गळती असून पाण्याचे कनेक्शनही अनधिकृत घेण्यात आले होते. मात्र रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेने सोसायटीचा पाणीपुरवठा खंडित केला असून आता टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशी परिस्थिती असतानाही प्राधिकरणाने या इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र कसे दिले असा सवाल रहिवाशांनी केला असून सदनिकांचा ताबा घेण्यासाठी विकासकाकडून धमकावण्यात येत असल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर इमारत कधीही कोसळू शकेल, अशी भीतीही रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केली आहे.