निवडणूक कार्यालयाने नेमलेल्या व्यक्तीचा वर्गात घरोबा; प्रकार उघड झाल्यानंतर हकालपट्टी

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : महापालिकेने निवडणूक कार्यालयासाठी दिलेल्या मुंबई सेंट्रल येथील गिल्डरलेन पालिका शाळेतील वर्गखोलीच्या पत्त्यावर एका व्यक्तीने आधारकार्ड काढल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. निवडणूक कार्यालयाने आपल्याला येथे पाठविल्याचा दावा करीत या व्यक्तीने गिल्डरलेन शाळेत चौकशीसाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांचीच बोळवण केली. अखेर पालिका अधिकाऱ्याने या व्यक्तीची शाळेतून हकालपट्टी केली. तसेच त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदविण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. मात्र महिना होत आला तरी या पत्राचे उत्तर पालिकेला मिळालेले नाही.

काही वर्षांपूर्वी निवडणुकीच्या कामानिमित्त पालिकेने निवडणूक आयोगाला मुंबई सेंट्रल येथील गिल्डरलेन पालिका शाळेतील वर्गखोल्या दिल्या आहेत. या वर्गखोल्या आजही निवडणूक आयोगाच्याच ताब्यात आहेत. या वर्गखोल्यांमध्ये निवडणूकविषयक साहित्य ठेवण्यात आले आहे. तसेच साहित्याच्या देखभालीच्या निमित्ताने सोमनाथ नामक एका व्यक्तीची तेथे नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूकविषयक साहित्याची देखभाल करण्याच्या निमित्ताने सोमनाथ तेथे डेरेदाखल झाला आहे. निवडणूक साहित्य ठेवलेल्या एका वर्गखोलीत त्याने स्वयंपाकघर थाटले आहे. गेली अनेक वर्षे सोमनाथ या शाळेत  वास्तव्यास असल्याने पालिका अधिकाऱ्यांनी १४ डिसेंबर २०१९ रोजी त्याची चौकशी केली. आपल्याला निवडणूक कार्यालयाने येथे पाठविले असून जोपर्यंत निवडणूक कार्यालय आपल्याला येथून जायला सांगत नाही, तोपर्यंत आपण येथून जाणार नाही, असे उर्मटपणे उत्तर देत त्याने पालिका अधिकाऱ्यांचीच बोळवण केली. शाळेत वास्तव्य करणाऱ्या सोमनाथकडे पालिका अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी त्याने आपले आधारकार्ड पालिका अधिकाऱ्यांच्या हाती ठेवले. सोमनाथचे नाव आणि छायाचित्र असलेल्या आधारकार्डवर ‘१/२७, गिल्डरलेन म्युनि. शाळा, बेलासिस ब्रिज लो लेवल, शगून हॉटेलसमोर, मुंबई – ४००००८’ हा  पत्ता पाहून पालिका अधिकारी चक्रावून गेले.

या शाळेत शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेची बाब लक्षात घेत पालिकेने मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ कार्यालयातील निवडणूक अधिकाऱ्यांना १८ डिसेंबर २०१९ रोजी पत्र पाठवून सोमनाथविषयी चौकशी करण्याचा प्रयत्न केला. शाळेमध्ये वास्तव्य करण्याबाबत सोमनाथला परवानगी पत्र देण्यात आले आहे का, अशी विचारणा पालिकेने या पत्रात केली आहे. मात्र या पत्राचे उत्तर अद्याप पालिकेला मिळालेले नाही. अखेर पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी शाळेतील विद्यार्थिनींची सुरक्षा लक्षात घेत चार-पाच दिवसांपूर्वी सोमनाथची या शाळेतून हकालपट्टी केली. तसेच त्याने शाळेच्या पत्त्यावर काढलेले आधारकार्डही अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. पालिकेच्या मालकीच्या इमारतीचा पत्ता देऊन आधारकार्ड काढणाऱ्या सोमनाथविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठीही पालिका निवडणूक कार्यालयाच्या पत्राची प्रतीक्षा करीत आहे.

शाळेच्या पत्त्यावर आधारकार्ड काढणाऱ्या ‘त्या’ इसमास तेथून बाहेर काढण्यात आले आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाच्या संबंधित अधिकाऱ्याकडे खातरजमा केल्यानंतर शाळेच्या पत्त्यावर आधारकार्ड काढणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

– प्रशांत गायकवाड, साहाय्यक आयुक्त, ‘डी’ विभाग कार्यालय