४५ लाख रोकड, सहा लाखांचे दागिने घेऊन पोबारा

मुंबई : इमारतीमधील दोन सुरक्षारक्षकांनीच एका सराफाच्या घरात चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.  या दोघांनी सराफाच्या घरातून ४५ लाख रुपयांची रोकड आणि सुमारे सहा लाखांचे दागिने घेऊन पोबारा केला. हा प्रकार बोरिवली पूर्व येथील दौलतनगरमधील ‘ओअ‍ॅसिस’ इमारतीत घडला.

‘ओअ‍ॅसिस’ इमारतीत सहाव्या मजल्यावर राहाणाऱ्या अमित जयंतीलाल शहा यांचे घर सुरक्षारक्षकांनी फोडले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ जुलैला शहा कुटुंब लोणावळा येथे पर्यटनासाठी निघाले. त्या वेळी यापैकी एका सुरक्षारक्षकाने शहा कुटुंबाचे सामान सहाव्या मजल्यावरून खाली आणले आणि ते गाडीत ठेवण्यासाठी मदत केली. शहा कुटुंबाची गाडी इमारतीच्या आवारातून बाहेर पडताच सुरक्षारक्षकाने जोडीदारासह चोरीचा कट आखला. दोघांनी गच्चीतून शहा यांच्या शयनकक्षापर्यंत मजल मारली. खिडकीच्या काचा काढून आत प्रवेश केला. तेथील कपाट तोडले आणि दोघांच्या हाती घबाड लागले.  ऐवज घेऊन दोघांनी  मुंबई सोडल्याचा संशय पोलिसांना आहे. शहा यांचे घर सोडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपलेले चित्रण साठवून ठेवणारा डीव्हीआरही दोघांनी सोबत नेला असला तरी त्यांचे नाव आणि अन्य तपशील पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्याआधारे पोलिसांची विशेष पथके दोघांच्या मागावर आहेत.

दोन्ही सुरक्षारक्षक नेपाळचे रहिवासी असून काही वर्षांपासून या इमारतीत काम करत होते. दिलेली जबाबदारी, कामे चोख पार पाडल्याने त्यांच्यावर रहिवाशांचा विश्वास होता. त्यामुळे या दोघांच्या जिवावर घर सोडून इमारतीतील रहिवासी बाहेर पडत. १४ जुलैला लोणावळ्याहून परतलेल्या शहा कुटुंबाला घराचे दार उघडताच धक्का बसला.