मुंबई-पुणे महाद्रुतगती मार्गावरील सुमारे ८० टक्के अपघात चालकांच्या चुकीमुळे होतात. असे अपघात रोखण्यासाठी या मार्गावर येत्या दोन महिन्यांत स्वयंचलित टेहळणी यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) जयदत्त क्षीरसागर यांनी बुधवारी विधानसभेत दिली. तर या महामार्गावरील पोलिसांच्या संख्येतही २५ टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले. मुंबई पुणे- द्रुतगती महामार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघातांबाबतच्या चर्चेदरम्यान हा मार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचा असला तरी सुरक्षिततेची मानके मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाची नसल्याची कबुली सरकारने दिली. राज्यातील वाढते रस्ते अपघात ही चिंतेची बाब असून यापुढे सर्व महामार्गाचे दरवर्षी सुरक्षा ऑडिट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. द्रुतगती महामार्गावरील पाच ठिकाणीच मोठय़ा प्रमाणात अपघात घडत आहेत. त्या ठिकाणी अनेक उपाययोजना करण्यात येत असून दुभाजकाच्या ठिकाणी आता हायटेंसाईलस्टील वायर रोप रावण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात चार किमी अंतरात हा वायर रोप लावण्यात येणार असून त्याचा चांगला परिणाम दिसून आल्यास संपूर्ण महामार्गावर ही यंत्रणा बसविली जाईल. तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूला दगडी भिंत बांधण्यात येणार असल्याचेही जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या महामार्गावर सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना नसल्याचा आरोप बहुतांश सदस्यांनी केला. तसेच नियम तोडणाऱ्यांना जबर दंड करण्याची मागणीही सदस्यांनी केली. त्यावर दंडात वाढ करण्याबाबत कायद्यात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारला दोनवेळा प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र सरकारची विनंती केंद्राने मान्य केलेली नसून पुन्हा एकदा असा प्रस्ताव पाठविला जाईल असे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सांगितले.