एकीकडे करोनाची रुग्णसंख्या कमी होण्याचा ट्रेंड दिसत असताना दुसरीकडे देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. त्यासोबतच, करोनाच्या Delta आणि Delta Plus या व्हेरिएंट्समुळे देखील सरकारची, प्रशासनाची आणि सामान्य जनतेची चिंता वाढली आहे. मुंबईत अजूनही करोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नसताना एक नवी चिंताजनक माहिती समोर आली आहे. मुंबईत करण्यात आलेल्या सेरो सर्व्हेमध्ये शहरातल्या तब्बल ५० टक्क्यांहून जास्त लहान बालकांमध्ये करोनाच्या अँटिबॉडीज सापडल्या असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. यासोबतच याआधी करण्यात आलेल्या सर्व्हेपेक्षा आत्ताच्या सेरो सर्व्हेमध्ये मुंबईतल्या लहान मुलांमध्ये करोना अँटिबॉडीज सापडण्याचं प्रमाण वाढल्याचं देखील समोर आलं आहे.

मुंबईतील महानगर पालिकेच्या नायर रुग्णालय आणि कस्तुरबा मोलेक्युलर डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी यांच्यामार्फत हा सर्वे करण्यात आला होता. लहान मुलांमध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अधिक असल्याची मतं अनेक तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दुसऱ्या लाटेदरम्यानच हा सेरो सर्व्हे करण्याचे निर्देश दिले होते. १ एप्रिल २०२१ ते १५ जून २०२१ दरम्यान हा सर्वे करण्यात आला आहे.

कसा झाला सेरो सर्व्हे?

या सेरो सर्व्हेसाठी मुंबईच्या सर्व २४ वॉर्डमध्ये मिळून एकूण २ हजार १७६ नमुने गोळा करण्यात आले. यासाठी आपली चिकित्सा नेटवर्क आणि पालिकेच्या नायर हॉस्पिटलमधून १ हजार २८३ तर ८९३ नमुने हे दोन खासगी प्रयोगशाळांमधून गोळा करण्यात आले आहेत.

केंद्राच्या राज्यस्तरीय सेरो सर्व्हेच्या सूचना – वाचा सविस्तर

सर्व्हेमध्ये नेमकं काय आढळून आलं?

सेरो सर्व्हेच्या निष्कर्षांनुसार, मुंबईतल्या आरोग्य व्यवस्थेअंतर्गत असलेल्या ५० टक्क्यांहून जास्त बालकांना याआधीच करोनाची लागण होऊन गेली आहे. पेडियाट्रिक श्रेणीमध्ये येणाऱ्या सर्व वयोगटातील मुलांमध्ये सरासरी सेरो पॉझिटिव्हिटी रेट तब्बल ५१.१८ टक्के इतका आढळून आला. त्यापैकी सार्वजनिक क्षेत्रातील प्रमाण ५४.३६ टक्के तर खासगी क्षेत्रातील मुलांचं प्रमाण ४७.०३ टक्के इतकं नोंदवण्यात आलं आहे.

 

दरम्यान, या सर्व्हेसाठी १ ते १८ वयोगटातील मुलांचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये १ ते ४ वयोगटामध्ये ५१.०४ टक्के, ५ ते ९ वयगटामध्ये ४७.३३ टक्के, १० ते १४ वयोगटामध्ये ५३.४३ टक्के आणि १५ ते १८ वयोगटामध्ये ५१.३९ टक्के सेरो पॉझिटिव्हिटी रेट आढळून आला आहे. १० ते १४ या वयोगटामध्ये सर्वाधिक सेरो पॉझिटिव्हिटी रेट आढळून आला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं केलं १ लाख १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर! PF संदर्भातही मोठा निर्णय!

सेरो पॉझिटिव्हिटी रेट वाढला!

दरम्यान, या सर्व्हेमधून गेल्या वेळच्या तुलनेत यंदा सेरो पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याचं समोर आलं आहे. याआधी मार्च महिन्यामध्ये तिसरा सेरो सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये १ ते १८ वयोगटातील लोकसंख्येमध्ये सेरो पॉझिटिव्हिटी रेट ३९.४ टक्के इतका होता. आता तो ५० टक्क्यांच्याही वर गेला आहे.