शरद पवार यांचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय देशाला आर्थिक आणीबाणीकडे लोटणारा आहे. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, ते  शांत झोपलेत आणि सामान्य जनतेचे हाल सुरू आहेत. लबाडी करणाऱ्यांना फाशी द्या; पण सामान्य, गोरगरीब, शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. देशात सध्या सामान्य लोकांचीच आर्थिक कोंडी केली जात आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर देशात आर्थिक आणीबाणी निर्माण होईल आणि लोकांचे जीवन उद्ध्वस्त होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घाटकोपर येथे आयोजित करण्यात आलेल्या परिवर्तन सभेत बोलताना पवार यांनी नोटाबंदीवरून मोदी सरकारला लक्ष्य केले. गेल्याच आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला आले होते. त्या वेळी पवार आणि मोदी यांनी एकमेकांवर तुस्तिसुमने उधळली होती. मात्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात जनमानसातून संताप व्यक्त होऊ लागताच पवार यांनीही आज याच मुद्दय़ावरून थेट मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले. पवार यांनी या वेळी मोदीच्या एकाधिकारशाही कारभारावर हल्लाबोल करताना राज्य सरकारलाही लक्ष्य केले. नोटाबंदीचा निर्णय भ्रष्टाचार रोखणारा, दहशतवाद्यांची आर्थिक कोंडी करणारा असल्याने या निर्णयाचे सुरुवातीस सगळ्यांनीच स्वागत केले; पण आता परिस्थिती वेगळीच दिसत आहे. या निर्णयामुळे लोकखूश असल्याचे भाजपवाले सांगतात, पण हक्काच्या पैशासाठी लोक रांगेमध्ये मरतात, ही खुशी आहे का, असा सवाल पवार यांनी या वेळी केला. वेळेत काळजी घेतली गेली नाही तर दंगे, लुटालूट होईल, असे न्यायालयही सांगत आहे, याचा तरी विचार सरकारने करायला हवा. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

रोजंदारीवरीवरील कामगारांना यातना होत आहेत. चोरी, दरोडे करणारे सुटले आणि सामान्य जनतेचा छळ होत आहे. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी जनतेचा सन्मान ठेवत. मोदी मात्र परदेशात गेल्यावर आपल्याच देशातील लोकांवर चेष्टा, टीकाटिप्पणी करतात, हे त्यांना शोभणारे नाही, अशा शब्दांत पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

बुलेट ट्रेनवरून टीका

मुंबई महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा कारभार सामान्य लोकांना यातना देणारा आहे. मुंबईकरांच्या दृष्टीने उपनगरी लोकलचा जीवघेणा प्रवास हा सर्वात गंभीर प्रश्न असून पंतप्रधान  मोदी यांना मात्र त्याच्याशी काही देणेघेणे नाही. केंद्राने केवळ आठ हजार कोटींची गुंतवणूक केल्यास उपनगरीय रेल्वेच्या वाहतूक व्यवस्थेत ३०० टक्क्यांनी सुधारणा होऊ शकते. पंतप्रधानांना मात्र मुंबईकर प्रवाशांच्या अडचणींपेक्षा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्यात स्वारस्य आहे. ९८ हजार कोटींची ही बुलेट हवीच कशाला, अशा शब्दांत पवार यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.

मोदी-पवार सारखेच-ओवेसी

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस मागील पंधरा वर्षांपासून सत्तेत होती, तेव्हा कितीतरी वेळा धार्मिक आणि जातीय दंगली झाल्या. त्यामुळे अनेक निर्दोष मुस्लिम तरुणांना तुरुंगात डांबण्यात आले. मालेगाव, औरंगाबाद, पुणे येथील जर्मन बेकरी अशा कितीतरी प्रकरणात मुस्लिम तरूण निर्दोष असल्याचे सिध्द झाले आहे. त्यावेळी सत्ता शरद पवार यांचीच होती. तरीदेखील कारागृहात मुस्लिम आणि दलित तरूणच सर्वात जास्त संख्येने सडत होते. त्यामुळे मोदी आणि पवार हे एकसारखेच आहेत. त्यांच्यात काहीच फरक नाही, अशी टीका एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली.

नागरिकांशीच ‘कोल्ड प्ले’

मुंबईत कोल्ड प्ले नावाचा कार्यक्रम झाला. मात्र, मोदी सरकारने नोटाबंदीच्या निर्णयाने देशात खऱ्या अर्थाने ‘कोल्ड प्ले’चा खेळ सुरू केला आहे. नागरिक थंडीत कुडकुडत बँकांबाहेर रांगा लावून बसले आहेत. भाजपचा हा कोल्ड प्ले जनता कधीच सहन करणार नाही, अशा शब्दांत ओवेसी यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले.